कराड (प्रतिनिधी) – कराड नगर परिषदेने वाघेरी येथे करोना विलगीकरण कक्ष निर्माण केलेला आहे. या कक्षामध्ये करोनाबाधित असणाऱ्या काही रुग्णांच्या नातेवाईकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या कक्षाला नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी रविवारी भेट दिली. तेथे असलेल्या गैरसोयींबाबत अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करत तात्काळ सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना केल्या.
नगरपरिषदेने क्वारंटाईन करण्यात येत असलेल्या नागरिकांसाठी चार ठिकाणी विलगीकरण कक्ष उभारले आहेत. यामध्ये वाघेरी येथील कक्षास नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी रविवारी भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत आरोग्य आधिकरी आर. डी. भालदार, पाणी पुरवठा अधिकारी माणिक बनकर उपस्थित होते.
वाघेरी येथील व्यवस्थेची पाहणी करत असताना विलगीकरण कक्षातील पाण्याची टाकी खराब व तुटलेली असल्याचे त्यांना आढळले. नागरिकांच्या आरोग्यास हे हानीकारक आहे. सध्या करोनामुळे सर्वजण हैराण आहेत. करोनाबाधितांमुळे इतरांना त्रास होऊ नये यासाठी एकीकडे प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे सौम्य लक्षणे दिसणाऱ्या अथवा क्वारंटाईन केलेल्यांना योग्य सुविधा मिळत नसल्याबाबत नगराध्यक्षा शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. अनेक विलगीकरण कक्षात जेवणासाठी एकच टेबलची व्यवस्था आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांचा जीव धोक्यात घालू नका. त्यांना चांगल्या सुविधा द्या, यापुढे यामध्ये हलगर्जीपणा आढळल्यास योग्य कारवाईला सामोरे जावे लागेल अशा शब्दात त्यांनी कानउघडणी केली.
दरम्यान, वाघेरी येथील विलगीकरण कक्षातील पाण्याची टाकी तात्काळ बदलण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार अधिकारी वर्गाने त्याची तात्काळ अंमवबजावणी करणार असल्याचे सांगितले.
यावेळी आरोग्य केंद्राच्या नर्सेस, फायर ब्रिगेड कर्मचारी, तसेच विलगीकरण कक्षात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबर नगराध्यक्षा शिंदे यांनी चर्चा केली. विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची काळजी घेण्याचे त्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्याच्या सूचना केली. तसेच दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींनी नगर परिषदेला सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. याशिवाय या ठिकाणी राहणाऱ्या डॉक्टर व नर्स यांच्यासाठी पंखे व इतर साहित्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नगरपरिषद आरोग्य कर्मचाऱ्यांना स्वतः ची काळजी घेण्याबाबत त्यांनी सूचना केल्या.