दौंड -दौंड रेल्वे स्थानकावरून 1172 मजूर घेऊन श्रमिक विशेष रेल्वे आज रवाना झाली. दौंड तालुक्यातील परप्रांतीय मजूर जाण्यासाठी श्रमिक विशेष रेल्वेची सोय दौंड रेल्वे स्थानकात करण्यात आली होती. या रेल्वेगाडीला 24 डबे लावण्यात आलेले होते. यातील एका डब्यात 72 जागा बसण्यासाठी असतात; मात्र मजुरांना जाण्यासाठी एका डब्यात 54 जणांची व्यवस्था करण्यात आली होती.
या सर्व मजुरांचे तिकिटाचे पैसे मध्यप्रदेश राज्य सरकारने रेल्वेला दिले आहेत. त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या मजुरांना फक्त तिकीट देण्यात आले. हे मजूर रेल्वे स्थानकावर आल्यानंतर त्यांचे फिटनेस सर्टिफिकेट चेक करून एका रांगेत त्यांचे स्क्रिनिंग करण्यात आले.
यावेळी या मजुरांना दौंड तहसीलच्या वतीने फूड पॅकेट व पाणी बॉटल देण्यात आले. ही रेल्वे गाडी दौंडवरून ग्वाल्हेरला जाणार आहे. ती गाडी उद्या (दि. 11) रोजी सकाळी 10 वाजता ग्वाल्हेर स्थानकात
पोहचणार आहे.
या विशेष रेल्वे गाडीस दौंड-पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार संजय पाटील यांनी हिरवा ध्वज दाखवून गाडी पुढे गेली. यावेळी दौंड रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक सम्युल क्लिफ्टन, मुख्याधिकारी मंगेश शिंदे, पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक, तालुका आरोग्य अधिकारी अशोक रासगे आदी उपस्थित होते. दरम्यान, या मजुरांनी रेल्वे गाडी सुरू होताच भारत माता की जय, वंदे मातरम् या घोषण देत टाळ्या वाजवत आनंद व्यक्त केला.