श्रीलंकेतील इस्टर हल्ल्यातील मास्टर माईंडची ओळख पटली

कोलोंबो – सन 2019 मध्ये झालेल्या इस्टर संडेला झालेल्या प्राणघातक हल्ल्‌याचा सूत्रधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका कट्टरपंथी मौलवीची ओळख पटली आहे, असे श्रीलंकेच्या वरिष्ठ मंत्र्याने म्हटले आहे. या हल्ल्यामध्ये 11 भारतीयांसह 270 जण ठार झाले होते. इसिसशी संबंधित असलेल्या नॅशनल थाविद जमात (एनटीजे) या स्थानिक इस्लामी दहशतवादी गटाच्या 9 आत्मघातकी हल्लेखोरांनी तीन चर्चमध्ये आणि अनेक लक्‍झरी हॉटेलमध्ये 2019 च्या इस्टर रविवारी श्रीलंकेत एकाचवेळी बॉम्बस्फोट घडवून आणले होते.

नौफर मौलवी हा इस्टर बॉम्बस्फोटांचा सूत्रधार होता, असे सार्वजनिक सुरक्षा मंत्री सारथ वीरासेकरा यांनी पत्रकारांना सांगितले. या मौलावीला हजुल अकबर नावाच्या दुसऱ्या व्यक्तीने मदत केली होती. 32 संशयितांवर खून आणि खुनाचा कट रचल्याचा आरोप आहे. या संदर्भातील दस्ताऐवजांचे आठ संच अटर्नी जनरलकडे देण्यात आले आहेत, असे वीरासेकरा म्हणाले.

अन्य 75 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. कोठडीतील संशयितांची एकूण संख्या 211 आहे, ज्यात आरोपपत्र दाखल केलेल्या 32 आरोपींचा समावेश आहे, असेही ते म्हणाले. तमिळ बंडखोरांविरोधात तब्बल 37 वर्षे सुरू असलेले यादवी युद्ध 2009 च्या मे महिन्यात समाप्त झाल्याला दहा वर्षे पूर्ण होत असतानाच 2019 साली हे बॉम्बस्फोट झाले होते.

संभाव्य दहशतवादी हल्ल्‌यांविषयी गुप्तचरांनी इशारा दिल्यानंतरही हे प्राणघातक हल्ले रोखण्यात अपयशी झाल्याबद्दल तत्कालीन अध्यक्ष मैत्रिपाला सिरीसेना आणि पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांच्या नेतृत्वाच्या तत्कालीन सरकारवर ठपका ठेवला गेला होता आणि या हल्ल्‌यांनी राजकीय वादळ निर्माण झाले होते. सिरीसेना यांनी त्यांच्या कारकिर्दीत हल्ल्‌यांच्या चौकशीसाठी अध्यक्षीय समिती नेमली होती. या समितीने आपल्या अहवालात माजी अध्यक्ष सिरीसेना आणि माजी संरक्षण सचिव, माजी पोलीस महानिरीक्षक आणि गुप्तचर प्रमुख यांच्यासह अन्य उच्च संरक्षण अधिकाऱ्यांनी गोपनीय माहितीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल दोषी धरले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.