सीडनी – सीडनीमधील शॉपिंग सेंटरमध्ये चाकू हल्ला केलेल्या हल्लेखोराची ओळख पटली आहे. या ४० वर्षे वयाच्या हल्लेखोराचे नाव जोएल कावची असे होते, असे न्यू साऊथ वेल्सच्या पोलिसांनी म्हटले आहे.
तो मानसिक आजाराने ग्रस्त होता, असे चौकशीमध्ये आढळले आहे. त्यामुळे त्याने केलेला हा हल्ला म्हणजे दहशतवादी हल्ला असल्यानुसार तपास केला जात नसल्याचे सहायक पोलीस आयुक्त ऍन्थनी कुक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हा हल्ला म्हणजे एखाद्या विचारधारेतून करण्यात आलेला दहशतवादी हल्ला म्हणावा, असे कोणतेही पुरावे आतापर्यंत मिळालेले नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
बोन्डी जंक्शन येथील वेस्टफिल्ड शॉपिंग सेंटरमध्ये या हल्लेखोराने भोसकल्यामुळे ६ जण ठार झाले होते. एका पोलीस महिलेने या हल्लेखोराला गोळी घालून ठार केले होते. या पोलीस महिलेचे पंतप्रधान ऍन्थनी अल्बानीस यांनी कौतुक केले आहे.
या हल्ल्यामध्ये अन्य १२ जण जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. जखमी झालेल्यांमध्ये ९ महिन्याच्या एका मुलीचाही समावेश आहे. या मुलीची आई या हल्ल्यात मरण पावली होती.
मरण्यापूर्वी तिने आपल्या कन्येला एका अनोळखी व्यक्तीच्या स्वाधीन केले होते आणि तिचे रक्षण करण्याची जबाबदारी सोपवली होती. थोड्याच वेळात तिने प्राण सोडले होते.