शिरूर – शहरातील व्यापारपेठ उघडण्यासाठी गुरुवार (दि.21) निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार अशोक पवार यांनी दिली. चौथ्या लॉकडाऊनची नियमावली अजून प्राप्त झाली नाही. ती नियमावली आल्यानंतर योग्य निर्णय घेऊ. तसेच लॉकडाऊनचा शिरूर पॅटर्न तयार करू, असेही त्यांनी सांगितले.
शिरूर तहसील कार्यालयात आमदार पवार यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभाग, नगर परिषद, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक रुग्णालय, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसमवेत लॉकडाऊनसंदर्भात व्यापारी, डॉक्टर, मेडिकल असोसिएशन यांची सोशल डिस्टन्स ठेवून समन्वय बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
आमदार पवार म्हणाले की, शिरूर शहरात येणारी प्रत्येक गाडी चेक झाली पाहिजे. आमदार अशोक पवार असले तरी त्यांची गाडी चेक करा, अशा शब्दांत आमदार पवार यांनी शिरूर पोलिसांना सूचना देण्यात आल्या. स्वतंत्र चेक पोस्ट शिरूर शहरासाठी हवा आहे. त्यासाठी जागेची पाहाणी केली. शहरात दुकान आणि घर एकाच बिल्डिंगमध्ये असेल तर अशा व्यापाऱ्यांना पोलिसांनी त्रास देऊ नये. शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
यावेळी प्रांताधिकारी संतोष कुमार देशमुख, नगर परिषद सभागृह नेते प्रकाशभाऊ धारिवाल, तहसीलदार लैला शेख, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे, तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे, मुख्याधिकारी महेश रोकडे, शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक तुषार पाटील, डॉ. स्वप्नील भालेकर, किराणा असोसिएशनचे विनय संघवी, कापड असोसिएशनचे बगाडे, मेडिकल असोसिएशनचे गलांडे, नगरसेवक विठ्ठल पवार, मुजफ्फर कुरेशी, संतोष भंडारी, रंजन झांबरे उपस्थित होते.
पारनेर, श्रीगोंद्यातील घुसखोरीवर चर्चा
जिल्हाबंदी असूनही पारनेर, श्रीगोंदा तालुक्यातील किंवा अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना शिरूर शहरात कुठल्याही कामासाठी येण्यास बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांनी केली. पासेस दाखवून नागरिक येत असल्याचेही सांगण्यात आले. व्यापारी- नागरिकांनी सोशल डिस्टन्स, मास्क वापरणे, हे महत्वाचे आहे.
जर नियम पाळणार नाही तर करोनाचा शिरकाव होण्यास वेळ लागणार नाही, व्यापाऱ्यांकडून दुकाने काहीवेळ उघडी ठेवावी, अशी मागणी करण्यात आली. शहरासाठी वेगळा शिरूर पॅटर्न आपल्याला तयार करता येईल का, याबाबत नवीन नियमावली आल्यावर त्यावर चर्चा करू, असे पवार यांनी सांगितले.