करोना रुग्णदर उतरणीकडे : प्रशासनाचा दावा
पुणे – करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठ येथे छोटी घरे आहे. त्यात एका घरात 5 ते 6 जण राहतात. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. पण, सध्या पूर्वीच्या तुलनेत भवानी पेठेतील रुग्णदर कमी होत आहे, अशी माहिती महापालिका व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व साखर आयुक्त सौरभ राव यांनी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत स्वॅब तपासणी सेंटर व कंटेन्मेंट क्षेत्रांची पाहणी केली. तसेच महापालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली.
डॉ. म्हैसेकर आणि सौरभ राव यांनी सावित्रीबाई फुले शाळेतील स्वॅब सेंटरला भेट दिली. येथील नागरिकांची नोंदणी, स्वॅब आणि विलगीकरण कक्ष, प्रत्येक ठिकाणची सुविधा, भोजन याची सविस्तर माहिती घेतली. तसेच भवानी पेठ व रामोशी गेट परिसरात प्रतिबंधित भागाची पाहणी केली.
येथील ज्येष्ठ नागरिक, उच्च रक्तदाब, श्वसन विकार असणाऱ्यांची माहिती अद्ययावत करुन त्यांच्या तपासणीवर भर देऊन अधिक काळजी घ्यावी, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. तसेच या परिसरात आजपर्यंत आढळलेले संशयित, बाधित रुग्ण, स्वॅब टेस्टिंग, सुविधा, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, सर्वेक्षण,
जनजागृतीविषयी त्यांनी माहिती घेतली.