पुणे – मंगळवार पेठेत बॅंकेच्या बाहेर कमरेला गावठी कट्टा लावून उभ्या असलेल्या सराईत गुन्हेगारास समर्थ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून गावठी कट्टा व एक काडतूस असा 30 हजार रुपयांचा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला. त्याच्यावर सातारा जिल्हयात चार गुन्हे दाखल आहेत. तो कट्टा घेऊन का उभा होता याचा तपास पोलीस करत आहेत.
समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई हेमंत पेरणे यांना माहिती मिळाली की, मंगळवार पेठेत बारणे रस्ता येथे एक संशयित इसम कमरेला पिस्टल लावून उभा आहे. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते यांचे पथकाने सदर ठिकाणी जावून कायदेशीर कारवाई करत संबंधित इसमास शोधून काढून जेरबंद केले.
आकाश भगवान त्रीभुवन (वय-25,रा.बालेवाडी, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. त्याचे अंगझडतीत त्याच्या उजव्या बाजुच्या कमरेस पॅन्टच्या आत खोचलेला 30 हजार रुपये किंमतीचा एक गावठी कट्टा व काडतुस मिळून आले आहे. याप्रकरणी त्याच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात आर्म्स ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी विरुध्द सातारा जिल्हयात शरीरा विरुध्दचे चार गुन्हे दाखल आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, उपनिरीक्षक विशाल मोहिते, पोलीस हवालदार संतोष काळे पोलीस शिपाई निलेश साबळे, हेमंत पेरणे, बाळासाहेब पाटोळे, दत्ता सोनवणे, सुभाष मोरे, शुभम देसाई, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, सचिन पवार, सुमित खुट्टे यांच्या पथकाने केली.