पिंपरी : ‘ती’ लाचखोर महिला पोलीस कर्मचारी अखेर निलंबित

पिंपरी (प्रतिनिधी)  – वाहतूक नियमन करताना एका महिला वाहतूक पोलिसाने अनोख्या पद्धतीने लाच स्वीकारली. संबंधित कर्मचारी थेट खिशात पैसे घेत असल्याची व्हिडीओ क्‍लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. यावरून “त्या’ महिला वाहतूक पोलिसाचा ‘कसुरी अहवाल’ वरिष्ठांकडे सादर करण्यात आला. त्यानंतर महिला पोलिसाचे निलंबन करण्यात आले.  दै. ‘प्रभात’ ने याबाबतचे वृत्त सर्वप्रथम व्हिडीओ क्लिपसह प्रसारित केले होते.

स्वाती सिताराम सोन्नर, असे निलंबित करण्यात आलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. सोन्नर या वाहतूक शाखेच्या पिंपरी विभागात कार्यरत आहेत. पिंपरी येथील साई चौक येथे मंगळवारी (दि. 15) काही पोलीस वाहतूक नियमन करीत होते. त्यातील महिला वाहतूक पोलीस स्वाती सोन्नर यांनी दुचाकीवरून आलेल्या दोन महिलांना थांबविले. त्यावेळी काही जणांनी मोबाईलमध्ये याची व्हिडीओ क्‍लिप तयार केली.

काय होते प्रकरण…..

महिला पोलीस सोन्नर यांनी दुचाकीवरून आलेल्या एका तरुणीला सूचना केली. त्यानंतर सोन्नर पाठमोऱ्या होताच संबंधित तरुणी सोन्नर यांच्या मागच्या खिशात पैसे ठेवत असल्याची व्हिडिओ क्‍लिप व्हायरल झाली. वाहतूक पोलिसांच्या लाचखोरीच्या अनोखी शक्कलची चर्चा त्यामुळे झाली.

महिला वाहतूक पोलिसाचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच त्यावेळी साई चौक येथे वाहतूक नियमन करीत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात येत आहे.
श्रीकांत डिसले,

सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा, पिंपरीचिंचवड

त्यानंतर याप्रकरणी कसुरी अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त यांच्या मार्फत पोलीस उपायुक्त यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर उपायुक्त यांनी गुरुवारी सायंकाळनंतर स्वाती सोन्नर यांच्या निलंबनाचे आदेश दिले.

काय आहे खुलासा ?

आपल्या खिशात पैसे ठेवणारी महिला ही ओळखीची आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी वस्तू खरेदी केली होती त्याचे पैसे मी दिले. त्यांनी ते त्या दिवशी परत दिले आहेत, असा अजब खुलासा त्या महिला वाहतूक पोलिसाने केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.