पाटणा – बिहार विधानसभेच्या सभापतिपदी भाजपचे ज्येष्ठ सदस्य विजयकुमार सिन्हा यांची निवड झाली आहे. प्रत्यक्ष मतदानाने ही निवडणूक घेण्यात आली. त्यात सिन्हा यांना 126 मते तर राजदचे अवध बिहारी यांना 114 मते मिळाली आहेत. या निवडणुकीतील मतदानामुळे बिहार विधानसभेत विद्यमान सरकारच्याच मागे बहुमत असल्याचेही सिद्ध झाले आहे.
या मतदानाच्यावेळी मुख्यमंत्री नितीशकुमार विधानसभेत उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितील राजद नेत्यांनी जोरदार आक्षेप घेतला. मुख्यमंत्री विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या मतदानाला ते उपस्थित राहू शकत नाहीत असा आक्षेपाचा मुद्दा राजद व अन्य विरोधी सदस्यांनी उपस्थित केला होता.
पण त्यांचा हा आक्षेप हंगामी सभापतींनी अमान्य केल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाला प्रारंभ झाला. गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेण्याची विरोधी पक्षांची मागणीही फेटाळून लावण्यात आली. नंतर आवाजी मतदानाने ही निवड झाली. त्यात सिन्हा यांच्या बाजूने 126 जणांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले.