डास किंवा मच्छर या किटकांमुळे भले भले महारथी त्रस्त होतात. यांच्या चाव्याने मलेरिया, डेंग्यू, चिकूनगुनिया यासारखे विविध जीवघेणे आजार होऊन जीवाला मुकण्याची वेळ येते. म्हणूनच आपल्या घरी तसेच आजूबाजूला वातावरण स्वच्छ ठेवणे गरजेचे असते.
डास चावल्यानंतर होणारी खाज तसेच कानाजवळ होणारी गुणगुणदेखील आपल्याला त्रास देते. झोपताना डास चावल्यानंतर झोपच उडून जाते. डासांना घालविण्यासाठी तसे तर विविध प्रकारचे स्प्रे, उदबत्त्या, इलेक्ट्रिक बॅट बाजारपेठेत उपलब्ध आहेत. परंतु डासांना घालवण्यासाठी काही घरगुती उपायदेखील आहेत. जे हर्बल आणि नैसर्गिक असल्याने काहीही त्रास होत नाही. शिवाय ते अत्यंत कमी खर्चात करता येतील.
चला तर, पाहुयात कोणते उपाय आहेत….
1. कापूर – डासांच्या प्रादुर्भावाला दूर करण्यासाठी कापराचा वापर खूप उपयुक्त ठरू शकतो. डासांना घालवण्यासाठी खोलीचे दार आणि खिडक्या बंद करून कापूर जाळून ठेवून द्या. यानंतर 15 ते 20 मिनिटे खोली बंद ठेवा. असे केल्याने सर्व डास पळून जातील आणि बराच काळ डास खोलीत येणार नाहीत.
2. कडुलिंबाचे तेल – कडुलिंबाचे तेल डासांना घालवण्यासाठी प्रभावी आहे. एका रिपोर्टनुसार, नारळाचे तेल आणि कडुलिंबाचे तेल समप्रमाणात मिसळून आपल्या शरीरास लावल्याने डास जवळ येणार नाही. अँटीफंगल, अँटीवायरल आणि अँटी बॅक्टेरियलच्या गुणधर्माने समृद्ध असलेल्या या कडुलिंबाच्या वासाने डास दूर पळतात.
3. पुदिन्याचे तेल – डासांना घालविण्यासाठी पुदिन्याचे तेल खूप प्रभावी आहे. पुदिन्याच्या तेलाला आपण आपल्या शरीरावर लावावे किंवा आपल्या घरात असलेल्या झाडांवर देखील फवारणी करू शकता. यामुळे डास जवळ येत नाहीत. पुदिन्याची पाने पाण्यात उकळवून त्याची फवारणी घरात केली तरी डास येत नाही.
4. तुळस – डासांच्या अळ्या काढण्यासाठी तुळस प्रभावी आहे. जर आपण खोलीच्या खिडकीत तुळशीचे रोपटे लावल्यास यामुळे डास घरात होत नाही. याचा उल्लेख आयुर्वेदात देखील केलेला आहे. तुळशीच्या वनस्पतीमुळे डास लवकर पळतात.