पुणे – हवाई दलातर्फे गेल्या काही वर्षांपासून “मिग 29′ या लढाऊ विमानांचे अत्याधुनिकीकरण सुरू आहे. ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहचली असून, “मिग 29′ प्रकारातील शेवटची दोन विमाने नुकतीच ओझर (नाशिक) येथील दुरूस्ती डेपो येथे दाखल झाली आहेत. लवकरच “मिग 29′ प्रकारातील सर्व विमानांचे अत्याधुनिकीकरण पूर्ण होऊन हवाई दलाची ताकद वाढण्यास मदत मिळणार आहे.
भारतीय हवाईदलात 1990मध्ये दाखल झालेल्या “मिग 29′ या लढाऊ विमानांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी हवाई दलातर्फे विमानांचे अत्याधुनिकीकरण केले जात आहे. या प्रक्रियेअंतर्गत विमानांमध्ये आवश्यक बदल करून, नवीन तंत्रज्ञान समाविष्ट केले जाते. पहिल्या फळीतील अत्याधुनिकीकरण पूर्ण झालेल्या “मिग 29′ विमानांचे प्रात्यक्षिक गेल्या वर्षी पंजाब येथील जालंधर येथे सादर करण्यात आले होते. यावेळी विमानांच्या क्षमतेबाबत हवाईदलातील तज्ज्ञांकडून प्रशंसा करण्यात आली होती.
रविवारी “मिग 29′ ताफ्यातील शेवटची दोन विमाने ओझर येथील दुरूस्ती केंद्रात दाखल झाली. तत्पूर्वी विमानांनी प्रात्यक्षिके सादर केली. याप्रसंगी एअर कमांडर समीर बोराडे यांनी “मिग 29′ तुकडीच्या प्रमुखांना स्मरणिका प्रदान केली.
जुन्या लढाऊ विमानांचे अत्याधुनिकीकरण प्रक्रिया ही अतिशय महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. यामुळे विमानाचे आयुर्मान आणि कार्यक्षमता तर वाढतेच शिवाय नवीन विमानांच्या खरेदीपेक्षा अत्याधुनिकीकरण प्रक्रिया अधिक उपयुक्त ठरते. “मिग 29′ च्या पूर्ण तुकडीचे अत्याधुनिकीकरण झाल्यानंतर यामुळे हवाई दलाच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास मोलाची मदत होणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.