सुरक्षा यंत्रणांकडून कठोर उपायांसाठी प्रयत्न सुरू
नवी दिल्ली : सौदी अरेबियातील तेल कंपनीवर ड्रोनव्दारे हल्ल्याची घटना आणि पंजाबमध्ये ड्रोनच्या मदतीनेच शस्त्रास्त्रे पुरवल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर देशातील सुरक्षा यंत्रणा एकदम सतर्क झाली आहे. ड्रोनच्या माध्यमातून दहशतवादी हल्ल्याबद्दल माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणेकडून सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर देशात सुमारे सहा लाखांहून अधिक ड्रोन बेकायदेशीर असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
देशात सहा लाखांहून अधिक मानव रहित एअर व्हिकल असून ती सुरक्षा यंत्रणांसमोर एक मोठे आव्हान असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या यंत्रणेवर मात करण्यासाठी आता स्कायन फेन्स आणि ड्रोन गन यासारख्या आधुनिक ड्रोन छेदन करणाऱ्या शस्त्रास्त्रांवर सुरक्षा यंत्रणा काम करत असल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भात अधिकृत ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आली असून त्यात असे म्हटले आहे की अनियंत्रित ड्रोन, यूएव्ही आणि रिमोट-ऑपरेट ऑपरेटिव्ह प्रणाली संवेदनशील स्थाने आणि विशिष्ट कार्यक्रमांना धोका दर्शवू शकतात आणि त्यांच्याशी सामना करण्यासाठी प्रभावी उपाय आवश्यक आहेत. सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, देशात सहा लाखाहून अधिक बेकायदेशीर ड्रोन आहेत. त्यांचा आकार आणि क्षमतेचा विचार करता त्यांचा कोणतीही विध्वंसक शक्ती वापर करण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.