सातारा – येथील संभाजीनगर परिसरात रस्त्याच्या कामावरील कामगारांच्या अंगावर खडी टाकल्याचा जाब विचारल्याच्या रागातून रस्त्याच्या कामाचे ठेकेदार संदीप दशरथ पिसाळ (इंदिरानगर, विलासपूर) यांच्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. या प्रकरणी पिसाळ यांच्या फिर्यादीवरून ऋत्विक शिंदे, संदीप मोरे, अमित जाधव, संतोष उर्फ गोट्या जगताप, अमित माने (सर्व रा. अमरलक्ष्मी, देगाव रोड, सातारा) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संदीप पिसाळ हे ठेकेदार असून संभाजीनगर परिसरातील रस्त्याचे काम ते करत आहेत. तेथील कामगारांच्या अंगावर खडी टाकून काही समाजकंटकांनी कामात अडथळा निर्माण केला. याचा जाब पिसाळ यांनी विचारल्याच्या रागातून संशयितांनी पिसाळ यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोनसाखळी चोरून नेली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. डी. बधे तपास करत आहेत.