वायसीएम रुग्णालयाचे यश : दुर्बिणीद्वारे “ओव्हरी सिस्ट’वर शस्त्रक्रिया
पिंपरी – गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून नावाजलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात “ओव्हरी सिस्ट’वर (अंडाशयातील गाठ) दुर्बिणीद्वारे दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याद्वारे महिलेच्या अंडाशयात तयार झालेली सुमारे पंधरा किलो वजनाची गाठ यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आली.
वायसीएम रुग्णालयाचे वरिष्ठ शल्य चिकित्सक डॉ. संजय पाडाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडमध्ये राहणाऱ्या एका 24 वर्षीय महिलेला पोटाच्या प्रचंड वेदना होत होत्या. तिचे डाव्या बाजूचे पोट फुगले होते. या महिलेने अनेक रुग्णालये पालथी घातली. मात्र, योग्य निदान होत नव्हते. एका खासगी रुग्णालयात निदान झाले. मात्र, शस्त्रक्रियेसाठी सुमारे दीड लाखांचा खर्च येईल, असे सांगण्यात आले. शेतकरी कुटुंबातील या महिलेसाठी हा खर्च अशक्य होता. पिंपरी महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयात यावर उपचार शक्य असल्याची माहिती या महिलेला मिळाली.
शस्त्रक्रियेसाठी ही महिला मंगळवारी (दि. 9) वायसीएम रुग्णालयात दाखल झाली. तिचे सीटी स्कॅन करण्यात आले. “ओव्हरी सिस्ट’ने ही महिला त्रस्त असल्याचे निदान झाल्यानंतर गुरुवारी (दि. 11) तिच्यावर दुर्बिणीद्वारे अवघे दोन टाके घालून शस्त्रक्रिया करण्यात आली. अडीच तासांच्या प्रयत्नानंतर तिच्या अंडाशयात तयार झालेली सुमारे पंधरा किलोची गाठ डॉक्टरांनी बाहेर काढली. या महिलेची प्रकृती स्थिर आहे. या शस्त्रक्रियेनंतर या महिलेच्या गर्भधारणेतील अडथळा दूर झाल्याची माहिती डॉ. संजय पाडाळे यांनी दिली. सर्वसाधारणपणे शस्त्रक्रिया केली असती तर पंधरा ते वीस टाके पडले असते. परंतु, दुर्बिणीमुळे अवघे दोन टाके घालून गाठेची चरबी बाहेर काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पाडाळे यांच्यासह डॉ. नितीन देशपांडे, डॉ. कांचन वायकोळे, डॉ. ज्ञानेश पाटील, डॉ. अभिजित श्रीवास्तव, ज्येष्ठ परिचारिका निता शेटे, सुजाता ताठे तसेच डॉ. भूलतज्त्र डॉ. मारुती गायकवाड, डॉ. जितेंद्र वाघमारे यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.