लोणावळा –आषाढी एकादशी निमित्ताने शुक्रवारी (दि. 12) डॉ. बी. एन. पुरंदरे बहुविध विद्यालय यांच्या प्राथमिक विभागाच्या शाळेची वतीने दिंडी काढण्यात आली होती.
अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाला संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज व महाराष्ट्रातील सर्व संतांच्या पालख्या आळंदी-देहूतून ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पंढरपूरला जात असतात. वारीची ही परंपरा, संत परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती विद्यार्थ्यांना समजावी तसेच प्रत्यक्ष वारीचा अनुभव यावा म्हणून शाळेच्या वतीने शाळेतील मुलांची दिंडी काढण्यात आली होती.
या दिंडीमध्ये कोणी संत तुकोबा झाले होते, कोणी जनाबाई, तर कुणी नामदेव महाराजांची वेशभूषा केली होती. “दिंड्या पताका हातात नाचवीत, ग्यानबा तुकारामाचा गजर’ करत ही पालखी काढण्यात आली. सह्याद्री नगर हुडको कॉलनी मधील मंदिरापर्यंत ही पालखी नेण्यात आली.
या ठिकाणी माजी नगरसेविका जयश्री काळे आणि रहिवाशांनी पालखीचे स्वागत व पूजन केले. तसेच यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक आनंद गावडे, सरला वीरकर, रसिका जगदाळे, जयश्री वाघमारे आणि नेहा सोनवणे हे शिक्षक उपस्थित होते.