बंद पाइप गटारीच्या कामाला वेग ः महापौर, उपमहापौरांनी केली पाहणी
नगर – दिल्लीगेट परिसरासह निलक्रांती चौक, न्यू लॉ कॉलेज गेट परिसरात पावसाचे पाणी साचून या भागातील नागरिकांना होणाऱ्या त्रासातून लवकरच मुक्तता होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला मंजूर केलेल्या 10 कोटी रुपयांच्या विशेष निधीतून या परिसरातील 1 कोटी रुपये खर्चाच्या बंद पाईप गटार व रस्ता कॉंक्रीटीकरणाच्या कामाला वेग आला असल्याने हा प्रश्न कायमचा मार्गी लागणार असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.
न्यू लॉ कॉलेज गेट ते निलक्रांती चौकापर्यत बंद पाईप गटार व रस्ता कॉंक्रीटीकरणाच्या कामाचा प्रारंभ 20 दिवसांपूर्वी करण्यात आलेला होता.
या काळात काय काम झाले याची पाहणी महापौर बाबासाहेब वाकळे व उपमहापौर मालनताई ढोणे यांनी शुक्रवारी (दि.12) केली. यावेळी माजी नगरसेवक धनंजय जाधव, अजय चितळे, संजय ढोणे, पुष्कर कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी, या भागात पावसाचे पाणी मोठ्या स्वरूपात वाहून येत असल्यामुळे पाण्याचा प्रवाह मोठा असतो. हा रस्ता शहरात जाणारा मुख्य रस्ता आहे. पावसामुळे या भागात पाणी साचून राहिल्यामुळे नागरिकांना जाण्या-येण्यास त्रास होतो.
याकरिता या भागाची पाहणी करून न्यू लॉ कॉलेज गेट ते निलक्रांती चौकापर्यत गटार साफ करण्याच्या कामास सुरूवात करण्याचे आदेश दिले होते. दिल्लीगेट ते न्यू आर्टस कॉलेज पर्यंतचा रस्ता मुख्यमंत्री यांच्या निधीमधून मंजूर असून त्यामध्ये साईड गटार देखील मंजूर आहे. त्या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आलेला असून त्यापैकी गटारीचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. या कामाला वेग आला असून लवकरच काम पूर्ण होवून हा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लागणार आहे.