कामशेत – गोवित्री विकास सोसायटीचे संचालक बाळू जाधव हे न मिळाल्याने त्यांचा मुलगा प्रवीण बाळू जाधव (वय २२, रा. गोवित्री ) याचे अपहरण करून त्यास मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी घडला. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळातील विकास सोसायट्यांच्या संचालकांची इच्छुकांकडून पाळावा-पळवी सुरु झाली असून विकास सोसायट्यांचे संचालक न मिळाल्यास त्यांच्या घरच्यांना दमदाटी व मारहाण करण्याचे प्रकार मावळात घडत आहेत.
गोवित्री विकास सोसायटीचे संचालक बाळू जाधव न मिळाल्याने त्यांचा मुलगा प्रवीण बाळू जाधव (वय, २२) यास राहुल बाळासाहेब नेवाळे, प्रणेश बंडू नेवाळे, अमोल नाथ नेवाळे व रोहिदास कुंडलिक शेवाळे (सर्व रा.गोवित्री, ता.मावळ) या चौघांनी शनिवारी (दि. २८) रात्री नऊ वाजता त्यांच्या ताब्यातील स्वीप्ट कार (एम. एच १४ / ८१८२) मधून जबरदस्तीने नेऊन तुझे वडील कोठे आहेत त्यांना बोलून घे असे बोलून प्रवीण जाधव यास पाले गावातील एका बंगल्यावर नेऊन खुर्चीला बांधून काठी व वायरने मारहाण करून पायास व हातास दुखापत केली, असल्याने प्रवीण बाळू जाधव याने राहुल बाळासाहेब नेवाळे , प्रणेश बंडू नेवाळे , अमोल नाथ नेवाळे व रोहिदास कुंडलिक शेवाळे ( सर्व रा. गोवित्री , ता.मावळ )यांच्या विरोधात कामशेत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे , या बाबतचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मृग्दीप गायकवाड हे करत आहेत