पुणे – अपेक्षित प्रमाणात डुक्कर पकडता न आल्याने संबंधित ठेकेदाराने महापालिकेकडे नुकसान भरपाई म्हणून तब्बल लाख रुपये मागितले आहेत. तसा करार झाल्याने आता ही रक्कम मिळालीच पाहिजे, असा आग्रह ठेकेदाराने धरला आहे.
शहराला डुक्कर मुक्त करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले असून, हे काम कर्नाटकातील एका ठेकेदाराला दिले आहे.
या ठेकेदारामार्फत दि.3 डिसेंबरला कारवाई करण्यात आली. मात्र, डुक्कर मालकांच्या विरोधामुळे अवघ्या 27 डुकरांसह त्याला परत जावे लागले. त्यामुळे भविष्यात डुकरांविना परतण्याची वेळ आल्यास महापालिकेकडे लाखाची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ठेकेदाराने केली आहे. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह 33 पोलिसांचे संरक्षण कारवाईदरम्यान हवे, अशीही अट त्याने टाकली आहे.
उपनगरांमध्ये मोकाट डुकरांमुळे नागरिकांना उपद्रव होत असून, मालमत्तेचेही नुकसान होत असल्याच्या तक्रारी येत असतात. त्यानुसार महापालिका प्रशासनाने जाहीर प्रकटनाद्वारे शहरातील सर्व डुक्कर 23 ऑगस्ट 2019 पर्यंत शहराबाहेर घेऊन जाण्याचे आवाहन डुक्कर मालकांना केले होते. यानंतर शहरात जी डुकरे आढळतील, ती महापालिकेच्या मालकीची असतील, त्या डुकरांवर मालकांचा कोणताही अधिकार राहणार नाही, असेही जाहीर करण्यात आले होते. याशिवाय शहरातील 58 डुक्कर व्यावसायिकांना यासंबंधी नोटीसाही दिल्या होत्या. त्यानंतर शहरातील डुक्कर महापालिकेकडून जप्त करण्यात येतील असे जाहीर प्रकटन 9 ऑगस्ट 2019 रोजी दिले होते. मात्र, या मुदतीनंतर शहराच्या विविध भागात डुक्करांची समस्या कायम होती.