गुन्हेगारी रोखण्यासाठी वापरणार “जालना’ पॅटर्न

अप्पर पोलीस आयुक्‍त रामनाथ पोकळे यांनी दिले संकेत

कमी कालावधीत चांगले काम केले- रानडे

मकरंद रानडे म्हणाले, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाचा पहिला अप्पर पोलीस आयुक्त म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. आयुक्‍तालय सुरू झाल्यानंतर दहा महिने काम करता आले. हा कालावधी कमी असला तरी पोलीस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक गोष्टी शिकता आल्या. दहा महिन्यांच्या कार्यकाळात आयुक्‍तालयाच्‌ी इमारत निश्‍चित करणे, मुख्यालय सुरू करणे, वाहतूक शाखा सुरू करणे यासह लोकसभा निवडणूक, गणेशोत्सव आणि अन्य सणांचा बंदोबस्त यशस्वीपणे पार पडताना आयुक्‍तालयातील सर्वांचे सहकार्य मिळाले.

पिंपरी – गतिमान पोलीस प्रशासन, लोकाभिमुख कारभार व ऑनलाईन प्रणालीचा वापर करून जालना जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढली होती. आता हाच जालन्याचा पॅटर्न पिंपरी चिंचवडमध्ये राबवून शहरातील गुन्हेगारी मोडीत काढू, असा विश्‍वास अप्पर पोलीस आयुक्‍त रामनाथ पोकळे यांनी पदभार स्विकारल्यानंतर व्यक्‍त केला. अप्पर पोलीस आयुक्‍त रामनाथ पोकळे यांनी (दि. 29) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयात अप्पर पोलीस आयुक्‍त पदाची सूत्रे हाती घेतली. राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई येथून त्यांची पदोन्नतीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयात अप्पर पोलीस आयुक्‍त पदावर बदली झाली आहे.

आयुक्तालयाचे पहिले अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्याकडून पोकळे यांनी पदभार स्वीकारला. पोकळे यांनी यापूर्वी पुणे ग्रामीण पोलीस दलात अतिरिक्‍त अधीक्षक, पुणे शहर पोलिस दलात उपायुक्‍त, सीआयडी पुणे येथे काम केले आहे. तसेच पदोन्नतीवर पोकळे यांनी जालना जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून देखील काम पाहिले.

पदभार स्विकारताना रामनाथ पोकळे म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराचे पहिले पोलीस आयुक्‍त आर के पद्मनाभन यांच्या कल्पनेतून सध्या अनेक योजना सुरू आहेत. या योजनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. जालना जिल्ह्यात पोलिसांसाठी राबविलेल्या योजनांना राज्यात प्रथम क्रमांक मिळाला होता. या योजना पिंपरी-चिंचवडमध्ये राबविण्यावर भर दिला जाणार आहे.

गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी स्ट्रीट क्राईम रोखणे हे प्रमुख उदिष्ट असणार आहे. जालना जिल्हा पोलीस अधीक्षक असताना तेथील गुन्हेगारी घटनांत मोठी घट झाली. अनेक आरोपी जेरबंद करण्यात आले. मुख्यत्वे ऑनलाईन प्रणालीचा वापर करून जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढली हेच सूत्र पिंपरी चिंचवडमध्ये अवलंबविण्यात येईल.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×