- नऊ महिन्यांत 21 कोटींचे अंमली पदार्थ जप्त
पिंपरी – गेल्या महिनाभरापासून बॉलिवुडमधील ड्रग्जच्या कनेक्शनबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 20 कोटी रुपयांचे मॅफेड्रोन (एम.डी.) जप्त केले आहेत. एकीकडे पिंपरी- चिंचवड पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे उद्योगनगरीमध्ये अंमली पदार्थ विक्री वाढत असल्याचे अधोरेखित झाले आहे. मागील नऊ महिन्यांत शहरात एकूण एकवीस कोटींचे अंमली पदार्थ हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पिंपरी- चिंचवडचा वाढती गुन्हेगारी लक्षात घेत 15 ऑगस्ट 2018 रोजी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर नोव्हेंबर 2018 मध्ये अंमली पदार्थ विरोधी पथक सुरू करण्यात आले. या पथकाने सुरुवातीलाच गुटखा विक्रीचे “रॅकेट’ काही प्रमाणात संपविण्यास करण्यात सुरवात केली. नोव्हेंबर आणि डिसेंबर 2018 या दोन महिन्यांतच पथकाने 16 जणांना अटक करून 50 लाख रुपयांचा गुटखा आणि सहा लाख रुपयांचा गांजा जप्त केला होता. या कारवाईमुळे शहरात मोठे रॅकेट सुरू असल्याचे पहिल्यांदाच समोर आले.
आयुक्तालयात स्थापनेपूर्वी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांसाठी पिंपरी- चिंचवड ही ‘सेफ सिटी’ होती. त्यामुळे त्यांनी शहरात आपली पाळेमुळे घट्ट रुजवून ठेवली आहेत. शहरातील आयटी हब हे मुंबईसह अन्य शहरातील मोठ्या तस्करांचे आकर्षण आहे. मात्र, शहरातील अंमली पदार्थांची तस्करी मुळासकट उखडून फेकण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी देखील विशेष लक्ष दिल्याने काही प्रमाणात का होईना अंमली पदार्थ तस्करीला चाप लावण्यात आला. मात्र निवडणूकीच्या काळात शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी केली असतानाही शहरात छुप्या मार्गाने गांजा येत होता. मात्र अंमली पदार्थ विरोधी पथकाने आपली धडाकेबाज कारवाई सुरूच ठेवली.
आयुक्तालय स्थापनेपूर्वी सन 2007 ते सन 2018 या दरम्यानच्या तब्बल अकरा वर्षांत पुणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केवळ 156 गुन्हे दाखल केले असून सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. त्यानंतरच्या काळात अंमली पदार्थ विरोधी पथकाने उल्लेखनीय कामगिरी केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
शहरातील अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट मुळासकट उखडून फेकण्याचे आदेश पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिले आहेत. त्यानुसार पथकाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य करण्याची गरज आहे. आपल्या भागात गांजा, गुटखा विक्रीसह इतर अंमली पदार्थ विक्रीचे गैर प्रकार सुरू असल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.
श्रीराम पौळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक
मागील नऊ महिन्यात अंमली पदार्थ पथकाने हस्तगत केलेला मुद्देमाल
गांजा – 32 लाख
गुटखा – 25 लाख 61 हजार
चरस – 13 लाख 14 हजार
दारू – 42 लाख
मॅफेड्रोन – 20 कोटी 39 हजार
सिगारेट – तीन लाख 14 हजार
एकूण – 21 कोटी 16 लाख 14 हजार