तळेगावातील मायमर रुग्णालयाचा अजब कारभार : महिला रुग्णाच्या मृत्यूनंतर “जनसेवा’ आक्रमक
तळेगाव दाभाडे – ‘डिपॉझिट’ भरायला पैसे नसल्याने व कागदपत्रांची पूर्तता नसल्याने मायमर हॉस्पिटलने उपचार करण्यास नकार दिला. त्यानंतर मायमर हॉस्पिटलच्या आवारात उपचाराअभावी चक्कर येऊन पडलेल्या महिलेचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. विशेष म्हणजे या वृद्ध महिलेला नायब तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्य समन्वयक डॉ. गुणेश बगाडे यांच्या मध्यस्थीने उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले.
या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर जनसेवा विकास समितीच्या वतीने मायमर हॉस्पिटलच्या आवारात आंदोलन करण्यात आले. सहा तास चाललेल्या आंदोलना दरम्यान मृताच्या नातेवाइकांकडून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देण्यात आला. या वेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मावळचे निवासी नायब तहसीलदार रावसाहेब चाटे व जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी ज्येष्ठ महिलेला आर्थिक परिस्थिती हलकीचे असल्याने तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये शनिवारी (दि. 11) वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले. मात्र या ज्येष्ठ महिलेला योग्य औषधोपचार न मिळाल्याने तिचा मंगळवारी (दि. 13) मृत्यू झाला.
तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये रुग्णांची पिळवणूक होत असल्याबाबत जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी आंदोलन केले. या वेळी मावळचे निवासी नायब तहसीलदार रावसाहेव चाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन दोषींची चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
अशा घटना वारंवार या हॉस्पिटलमध्ये घडत असल्याने जनसेवा विकास समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे मंगळवारी (दि. 13) 40 रुग्णांना औषधोपचार मिळाल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले. तळेगाव जनरल हॉस्पिटल मावळ तालुक्यात सर्वाधिक बेड, व्हेंटिलेटर बेड असलेले हॉस्पिटल असून, रुग्णांना रेमडेसीवर औषध तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ ना देता रुग्णांकडून पैसे उकळले जात असल्याचेही बोलले जात आहे. या हॉस्पिटलच्या प्रशासन, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना बोलण्याची भाषा योग्य नाही.
तसेच रुग्णांच्या नातेवाइकांना वारंवार औषधे आणण्यासाठी यादी दिली जाते. रुग्णाला बोलण्यासाठी संपर्क करुन दिला जात नाही. 16 व्हेंटिलेटर असताना रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. मावळ तालुक्यातील गरीब गरजू रुग्णांना औषधोपचार मिळत नसून, अन्य ठिकाणी धाव घ्यावी लागत आहे.
मावळ तालुक्यातील हॉस्पिटलमध्ये शिल्लक बेड, रुग्ण संख्या व औषधोपचार आदी माहिती प्रथमदर्शनी लावण्याची मागणी केली. मावळ तालुक्यातील 50 टक्के रुगांना बेड उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. या वेळी जनसेवा विकास समिती संस्थापक किशोर आवारे, नगरसेवक संतोष शिंदे, नगरसेवक रोहित लांघे, नगरसेवक निखिल भगत, प्रवक्ता मिलिंद अच्युत, सुनील पवार, कल्पेश भगत, अनिल पवार, संविद पाटील, अनिल कारके, चंदन कारके व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.
काही तासांत रेशनकार्ड…
मयत महिलेची आर्थिक हलकीची असल्याने मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी काही तासातच रेशनकार्ड त्या महिलेला बनवून दिले. स्वतः निवासी नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी या महिलेचा उपचार महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करण्याचे सांगितले. त्या महिलेच्या नातेवाईकांकडे 7 हजार 500 हजार रुपयांची औषधे तसेच मंगळवारी त्या महिलेचा मृत्यू झाल्यावर 14 हजार अगोदर द्या, मगच मृतदेह दिला जाईल व मृतदेह घेण्यास उशीर केल्यावर आणखी 5 हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.
मायमर रुग्णालय हे सर्व रुग्णांना दर्जेदार सुविधा देत आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत “या’ महिलेचे अगोदर नाव नव्हते. जेव्हा निवासी नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी रेशनकार्ड दिले तेव्हा या महिलेला उपचार सुरू करण्यात आले. पण मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता मृत्यू झाला. त्यांच्यावर उपचार करण्यात आलेले 14 हजार रुपयांचे बील माफ करण्यात आले आहे. उपचार करण्यास उशिर झालेला नाही. त्यामुळे रुग्णालयावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही.
– प्रशांत कामत, वैद्यकीय अधीक्षक, मायमर तळेगाव जनरल हॉस्पिटल