शनिवारी ‘चंद्र-मंगळ’ची युती; अनोखी खगोलीय पर्वणी

पुणे – आपला चंद्र जेव्हा आकाशातील एखाद्या तेजस्वी तारा किंवा ग्रहासमोरून जातो, त्यावेळी तो तारा किंवा ग्रह चंद्रामागे काही काळासाठी लुप्त किंवा दिसेनासा होतो. याला पिधान युती असे म्हणतात. तसे बघितले तर चंद्र रोज कोणत्या न कोणत्या ताऱ्यासमोरून जातो, पण क्वचितप्रसंगी तो एखाद्या ग्रहासमोरून जातो. येत्या शनिवारी (दि.17) नागरिकांना ही अद्‌भुत खगोलशास्त्रीय घटना अनुभवायला मिळणार आहे.

याबाबत मुंबई येथील नेहरू “प्लॅनेटोरियम’चे अरविंद परांजपे म्हणाले,”सूर्यग्रहणावेळी ज्याप्रकारे सूर्य हा चंद्रामागे लपला जातो, त्याचप्रकारे पिधान युतीमध्ये मंगळग्रह हा चंद्रामागे लपला जाईल.शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता ही मंगळ ग्रह चंद्रामागे झाकला जाण्यास सुरुवात होईल. तब्बल दोन तास मंगळ ग्रह चंद्रबिंबाच्या मागे दडून राहील. ही घटना कोणताही चष्मा अथवा इतर उपकरण न वापरता, नुसत्या डोळ्यांनीदेखील पाहता येईल.’

याबाबत माहिती देताना औरंगाबाद येथील एमजीएम-एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर म्हणाले, “आपल्याला ग्रहण म्हणजे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण इतकेच माहिती असते. परंतु पिधान युतीदेखील एक प्रकारचे ग्रहणच असते, ही पिधान युती अनेकदा होते पण आपल्या भागातून दिसण्याचा हा योग खूप वर्षानंतर आला आहे. ही एक अद्‌भुत आणि प्रेक्षणीय खगोलीय घटना असणार आहे. ही पिधान युती महाराष्ट्रासह संपूर्ण भारत, नेपाळ व तिबेट बांगलादेश या भागातून पाहायला मिळणार आहे.’

नुसत्या डोळ्यांनी लुटा पर्वणी
मंगळ ग्रह चंद्राच्या सावलीकडील भागातून सायंकाळी साडेपाच वाजता चंद्रामागे लपण्यास सुरुवात करेल, यावेळी सूर्य मावळलेला नसल्याने ही घटना नुसत्या डोळ्यांनी दिसणार नाही. मात्र, महाराष्ट्रात सायंकाळी 7:19 वाजतादरम्यान चंद्राच्या प्रकाशित भागाच्या खालील भागातून तांबडा मंगळ ग्रह बाहेर पडेल तेंव्हा हा प्रसंग विलोभनीय असणार आहे. या वेळेस अंधार असल्यामुळे हा प्रसंग नुसत्या डोळ्यांनी देखील पाहायला मिळणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.