पेशंटला डॉक्‍टरकडे न्यायचंय? पठाणचाचांना करा कॉल…

रिक्षातून रुग्णाला दवाखान्यात मोफत पोहोचवणारे पुण्याचे रिक्षावाले काका

कोरोना मानवतेवर आलेलं असं संकट की ज्या संकटात आपलाच माणूस आपल्यापासून दूर जातो. कोरोना झाल्यानंतर हॉस्पिटला जायंचं म्हटलं तर ऍम्ब्युलन्स मिळत नाही. अशा परिस्थिती कोणीही मदतीला ही येत नाहीत. मात्र, याला काही लोक अपवाद असतात. आपण या समाजामध्ये नागरिक म्हणून जगत असताना समाजाचं काहीतरी देणं लागतो, हे आपण अनेकदा ऐकलं आहे. परंतु या संदेशाला आचरणात आणणारे फार क्वचीत लोक खरंतर पाहायला मिळतात. आणि त्यातल्या त्यात सध्याची परिस्थिती पाहता असा अनुभव अगदी दुर्मिळच येतो.

संपूर्ण राज्यभरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणांवर ओढवणारा ताण आणि या सगळ्यांमध्ये जनतेला योग्य संदेश देणारे पुण्यातील पठाणचाचा यामुळेच चर्चेचा विषय ठरलेत. कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी दवाखान्यामध्ये जाण्याकरिता रुग्णवाहिका वेळेवर मिळत नाहीत. ही गोष्ट जेव्हा पठाण चाचाच्या लक्षात आली. तेव्हा चाचांनी कसलाही विचार न करता आपली रिक्षा या रुग्णांच्या सेवेत दाखल केली.

विशेष बाब म्हणजे ही सेवा देत असताना या चाचा रुग्णांकडून कुठलेही शुल्क घेत नाही. या सेवेसाठी त्यांनी आपले 8888343766, 8888883298 हे भ्रमणध्वनी क्रमांक रुग्णांच्या सेवेसाठी दिले आहेत. केव्हाही कुठल्याही गरजू रुग्णाने संपर्क साधल्यास पठाणचाचा थेट त्या रुग्णाच्या घरी जाऊन त्यांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचं कार्य नि:शुल्क करत आहेत.

पठाण चाचा सध्या पुणे महानगरपालिकेमध्ये कंत्राटी कामगार म्हणून कार्य देखील करीत आहेत. हे कार्य करण्याची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली? हे काकांना विचारले असता ते म्हणाले की, मागच्या वर्षी माझ्या मित्राच्या आईला कोरोना झाला होता त्यावेळी त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्याकरिता रुग्णवाहिका मिळाली नाही आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी जेव्हा मला समजली तेव्हाच मी ठरवलं आपण जरी आपल्या जिवलग मित्राच्या आईचे प्राण वाचवू शकलो नाही तरी आता आपली रिक्षा अनेक रुग्णांच्या सेवेत दाखल करून त्यांना मदत करायची. परंतु सुरुवातीला मला या कामासाठी माझ्या घरच्यांनी कडाडून विरोध केला. परंतू तो विरोध पत्करून मी माझं कार्य सुरूच ठेवलं. कारण हे कार्य करत असताना मी परमेश्वराची सेवा करतो, असं मला वाटतं आणि यामधून कोणालाच न मिळणारा आनंद माझ्या वाट्याला येतो. यासारखं दुसरं भाग्य नाही, असं सांगताना चाचांना अश्रू अनावर होतात.

अशा पठाणचाचांना सलाम.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.