9 सदस्यीय घटनापिठपुढे सुनावणी होणार
नवी दिल्ली : विविध धार्मिक स्थळांमध्ये प्रवेशासाठी महिलांना डावलण्यात येत असल्याच्या मुद्दयावरून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठापुढील सुनावणी 10 दिवसात पूर्ण केली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले.
9 सदस्यांच्या घटनापिठापुढे ही सुनावणी एकूण 10 दिवसात पूर्ण केली जाणार असून मुस्लिम महिलांना मशिदींमध्ये प्रवेश, दाऊदी बोहरा मुस्लिम समाजातील महिलांचे जननेंद्रिय विकृतीकरण आणि बिगर पारशी पुरुषांबरोबर विवाह झालेल्या पारशी महिलांनाही अगियारी या धार्मिक स्थळी प्रवेश नसण्याच्या मुद्द्यांवर न्यायालय विचार करेल.
केरळमधील शबरीमला देवस्थानामध्ये महिलांना प्रवेश नसण्याच्या धार्मिक प्रथेविरोधात आंदोलन झाल्यावर सर्व वयोगटातील महिलांना अयप्पा मंदिरात प्रवेश देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र त्या आदेशांनंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. या पार्श्वभुमीवर घटनापिठापुढे ही सुनावणी होणार आहे.