वाघोली (प्रतिनिधी) – लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत कटकेवाडी येथील एका नामांकित कंपनीच्या गोडाऊनमध्ये जवळपास 50 ते 60 लाख रुपयांची विद्युत उपकरणांची चोरी झाली असून या चोरीची तक्रार अद्याप पावतो पोलीस ठाण्यात करण्यात आली नसल्याने वाघोलीत मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले आहे.
एका नामांकित कंपनीच्या गोडांमधून विद्युत उपकरणांचा माल 31 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी चोरून नेला आहे. या कंपनीच्या गोडाऊन साठी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. सुरक्षारक्षक असताना देखील चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कटकेवाडी येथे भाजीपाल्याच्या गोडाऊन शेजारी एवढी मोठी चोरी होऊन देखील पोलिसात याबाबत कोणतीही माहिती किंवा लेखी तक्रार कंपनीच्या वतीने किंवा सुरक्षा रक्षकांच्या वतीने देण्यात आली नसल्याने मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली आहे.
कंपनी प्रशासन तसेच सुरक्षा रक्षक यांच्याकडून पोलिसांना साधी माहिती किंवा गुन्हा दाखल न झाल्याने याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.