झारखंड मंत्रिमंडळाचा विस्तार; सात मंत्र्यांचा समावेश

रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यानुसार, सात मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.
राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी येथील राज भवनात झालेल्या साध्या सोहळ्यात नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

विस्तारात मंत्री म्हणून संधी मिळालेल्यांमध्ये पाच जण झारखंड मुक्ती मोर्चाचे (झामुमो) तर दोघे कॉंग्रेसचे आहेत. विस्तारामुळे झारखंडमधील मंत्र्यांची संख्या आता 11 वर पोहचली आहे. एक मंत्रिपद अजूनही रिक्त आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत झामुमो-कॉंग्रेस-राजद आघाडीने बाजी मारली.

त्यानंतर झामुमोचे नेते हेमंत सोरेन यांनी मागील वर्षाच्या अखेरीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासमवेत कॉंग्रेसच्या 2 आणि राजदच्या 1 अशा एकूण 3 मंत्र्यांनी शपथ घेतली. आता विस्तारामुळे मुख्यमंत्र्यांसह झामुमोच्या मंत्र्यांची संख्या 6 तर कॉंग्रेसच्या मंत्र्यांची संख्या 4 इतकी झाली आहे.

घटनात्मक नियमांनुसार झारखंडमध्ये मुख्यमंत्र्यांसह 12 मंत्र्यांची नियुक्ती केली जाऊ शकते. त्या राज्यातील मागील भाजप सरकारने पाच वर्षांच्या पूर्ण कार्यकाळात एक मंत्रिपद रिक्त ठेवले होते.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.