कोल्हापूर :- राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारावर राज्य चालत असून प्रत्येक पिढीने शाहू विचारांचा अंगिकार केला पाहिजे. शाहूंच्या विचारांचा जागर नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे कृतज्ञता पर्व महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा 100 वा स्मृतिदिन हा कृतज्ञता पर्व म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त शाहू मिल येथे आयोजित कृतज्ञता सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार हे दुरभाष्य प्रणालीद्वारे पुणे येथून उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा शाहू महाराजांनी पुढे नेला. शाहू महाराजांचे काम हे डोंगरा एवढे मोठे असून त्यांचा प्रत्येक विचार हा क्रांतिकारी होता. त्यांच्या सामाजिक न्याय विचारावरच सामाजिक क्रांती घडली, असेही त्यांनी यावेळी विशद केले. तसेच छत्रपती शाहू महाराज हे रयतेचे काळजी घेणारे, आधुनिकतेचा स्विकार करणारे व दूरदृष्टी असलेले लोकराजा होते व त्यांनी सर्व जाती धर्मांना एकत्रित ठेवून विविध क्षेत्रात विकास घडवून आणला.
कोणत्याही महापुरुषाच्या स्मारकासाठी अंदाजपत्रकातील निधी ठेवण्याची आवश्यकता नाही तर अशा स्मारकासाठी जेवढा आवश्यक निधी असेल तो सर्व निधी देण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची असून शाहू स्मारकासाठी जेवढा लागेल तेवढा निधी शासन उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली. तसेच कोल्हापुरात सारथी संस्थेसाठी जागा देण्यात आलेली असून त्याबाबतचा आराखडा पुढील पंधरा दिवसात पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले.