बंगळुरू – कर्नाटक राज्यात नव्या राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. फोडाफोडीचं राजकारण करत भाजपने कर्नाटकमध्ये हातून गेलेली सत्ता परत आणली. मात्र या काळात झालेलं राजकारण आता समोर आलं असून मुख्यमंत्रीपदासाठी आपल्याकडे 2500 कोटींची मागणी केल्याचा दावा केला आहे.
मुख्यमंत्री व्हायचं असेल, तर 2500 कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी आपल्याकडे करण्यात आली, असा दावा भाजप आमदार बसनगौडा यतनाल यांनी केला आहे. यानंतर काँग्रेस आक्रमक झालं असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
यतनाल म्हणाले, राज्यातील काही दलालांनी आपल्याकडे मुख्यमंत्री होण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली. 2500 कोटी रुपये दिल्यास आपल्याला मुख्यमंत्री करण्यात येईल, असे मला सांगण्यात आले होते. मात्र राजकारणात एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा चोरांवर विश्वास ठेऊ नका, असं आवाहन देखील यतनाल यांनी केलं.