दिलीपराज चव्हाण
कोणत्याही क्षणी दुर्घटना घडण्याची शक्यता
उंब्रज – येथील मुख्य बाजारपेठेतील कन्या विद्यालयानजीक असणाऱ्या जुन्या शासकीय गोदामाची अर्धवट अवस्थेत असलेली भिंत धोकादायकपणे उभी आहे. ही मरनासन्न अवस्थेत उभी असून कोणत्याही क्षणी ती ढासळून एखादी दुर्घटना घडू शकते. एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
उंब्रज हे कराड तालुक्यातील राजकीय व सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे गाव आहे. एकेकाळी महत्त्वाची मोठी समजल्या जाणाऱ्या उंब्रज बाजारपेठेचे काही वर्षांपूर्वी तीनतेरा वाजले (का वाजवले) आहेत हे एक गुडरहस्य होऊन बसले आहे. बाजरपेठेतील दुकाने अतिक्रमण असल्याचे सांगत त्यावर नांगर फिरवला गेला. पण त्याचवेळी कन्या शाळेनजीकच्या कित्येक वर्षे मोडून पडलेल्या शासकीय गोदामाच्या भिंती या प्रशासनाला का दिसल्या नाहीत. आजही त्या इमारती कुणाचातरी जीव घेण्यासाठी उभ्या असल्याचा भास वेळोवेळी होत आहे.
या भिंती नजीकच्या कन्या शाळेत उंब्रज व परिसरातील शकडो मुली शिक्षणासाठी येत आहेत. त्यामुळे ही भिंत धोकादायक ठरत आहेत. कन्या शाळेच्या वतीनेही ही भिंत पाडण्याबाबत अनेकवेळा मागणी करण्यात आली आहे, पण त्याकडे कोणी लक्ष देत नाही. तसेच या भिंतीच्या आवारात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होऊ लागले आहे. त्याचा नाहक त्रास होत आहे.
कराड, पाटण, चाफळ, तारळे, मसूर विभागाचा मध्यबिंदू असणाऱ्या उंब्रजमध्ये शासकीय कार्यालये व शैक्षणिकसह इतर सुविधांमुळे चाफळ, तारळे, चोरे, विभागासह कराड तालुक्यातील आसपासच्या गावातील लोकांचा येथे सततचा राबता असतो. तसेच येथील बाजारपेठही मोठी असल्याने खरेदी-विक्रीचे व्यवहारही मोठ्या प्रमाणात चालतात. मुख्य बाजारपेठेत कन्या विद्यालय आहे. उंब्रजसह परिसरातील अनेक गावातील मुली येथे शिक्षणासाठी येत असतात.
या विद्यालयानजीक असणाऱ्या जुन्या गोडाऊन शेजारी मोठ्या प्रमाणात कचरा साठतो. तसेच बाजारपेठेतून येता-जाता कचऱ्याचे विदारक चित्र दिसते. शिवाय दुर्गंधीही पसरते. आत्ता असणाऱ्या भाजी मंडईत भाजीपाला घेताना फारच गर्दी असते. यामुळे वारंवार मोबाईल चोरीला जाण्याचे प्रकार घडतात. पार्किंग व्यवस्थित नसल्यामुळे वादाचे प्रसंग उद्भवतात. सदरची भिंत पाडल्यास उंब्रजला भेडसावणाऱ्या पार्किंग व वाहतूक कोंडीचा प्रश्नही सुटेल. या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी हि भिंत हटवणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.