भीषण पुरात प्राणरक्षक ठरलेल्या “शिवदुर्ग’चा गौरव

सात नागरीक, तीस जनावरांचे वाचविले प्राण : टीमला 51 हजार रुपयांचे रोख बक्षीस

कार्ला – संकटकाळी स्वतःचे जीव धोक्‍यात घालून अनेकांचे जीव वाचविणाऱ्या “शिवदुर्ग’ रेस्क्‍यू टीमचा कोथुर्णे ग्रामस्थांनी रोख रक्कम देत गौरव केला. पवना नदीला आलेल्या पुरामुळे मावळ तालुक्‍यातील कोथुर्णे गावात सात नागरीक आणि 30 जनावरे पुराच्या पाण्यात अडकली होती. शिवदुर्ग टीमने शर्थीचे प्रयत्न करून अडकलेल्या नागरीक व जनावरांना सुरक्षित बाहेर काढले.

“शिवदुर्ग’ने दाखविलेल्या धाडसाबद्दल कोथुर्णे गावातील ग्रामस्थ आणि जनावरांचे मालक रामचंद्र नढे यांच्याकडून शिवदुर्ग टीमला 51 हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. मावळ तालुक्‍यातील पवना नदीच्या काठावर वसलेल्या कोथुर्णे गावात रविवारी पूर आला होता. नदीच्या काठावर असलेल्या एका बंगल्यातील सात नागरीक पुराच्या पाण्यात अडकले. त्यांची सुटका शिवदुर्ग टीम आणि एनडीआरएफ कडून करण्यात आली. त्याचबरोबर बचाव पथकाने बंगल्याच्या शेजारी असलेल्या गोठ्यातून 30 जनावरांची देखील सुटका केली.

मावळ परिसरातील दऱ्या-खोऱ्यांमध्ये, धरण व इतर जलाशयांमध्ये अडकलेल्या तसेच कोणत्याही संकटात सापडलेल्या नागरिकांचे तसेच जनावरांचे प्राण वाचविण्यासाठी शिवदुर्गची टीम नेहमीच धावून जात असते. कोथुर्णे गावात आलेल्या पुरात नागरिक अडकल्याची माहिती शिवदुर्ग टीमला मिळाली. शिवदुर्ग टीम आणि एनडीआरएफचे पथक बोट आणि आवश्‍यक साहित्य घेऊन कोथुर्णे गावात पोहोचले. बचाव पथकाने बोटीतून बंगल्यात प्रवेश केला.

दोन महिलांसह एकूण सात नागरिकांना पुरातून बाहेर काढण्यात आले. बंगल्याच्या शेजारी असलेल्या एका गोठ्यात 30 गायी आणि म्हशी अडकल्याचे बचाव पथकाला समजले. पाण्यात दोरी टाकून जनावरांना देखील बाहेर काढण्यात आले. हे काम शिवदुर्ग टीमने दोन दिवस अविरतपणे केले.गोठ्याचे मालक रामचंद्र नढे व ग्रामस्थांनी शिवदुर्ग रेस्क्‍यू टीमच्या आनंद गावडे, राजेंद्र कडू, महेश मसने, दिनेश पवार, राहुल देशमुख, प्रणय अंभोरे, केदार देवाळे, विकास मावकर, सागर कुंभार, अनिल आंद्रे, तुषार सातकर, रोहित वर्तक, रितेश कुडतरकर, सुनिल गायकवाड आदींचे कौतुक केले. टीमला 51 हजार रुपयांचे रोख बक्षीस देखील दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.