काटेवाडी, (वार्ताहर)- प्रेमाच्या जाळ्यात ओढून अपहरण करत खंडणी उकळणारी टोळी जेरबंद करध्यात बारामती तालुका पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यात ज्योती कदम, अंकिता भोसले, निलेश बनसोडे, चेतन गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती अशी 12 फेब्रुवारी रोजी बारामती येथील एका डॉक्टरांना आरोपी महिला ज्योती कदम हिने भेटण्यासाठी बोलविले. त्याप्रमाणे डॉक्टर हे तिला भेटले असता तिने डॉक्टरांना तिच्यासोबत लॉजवर येण्याचा आग्रह केला; परंतु डॉक्टरांनी नकार दिल्यानंतर ते बारामती सिटी इन चौक येथील ऐश्वर्या हॉटेल येथे नाश्त्यासाठी गेले.
तिथे देखील ज्योती कदम ही डॉक्टरला लॉजवर तिच्यासोबत येण्यासाठी उद्युक्त करीत होती. नाष्टा संपल्यानंतर डॉक्टर व ज्योती कदम असे सूर्यनगरी वेदांत करिअर अॅकॅडमी समोर बोलत असताना तीचे साथीदार कुख्यात गुंड सतीश सूर्यवंशी, समीर सय्यद, चेतन गायकवाड, रामहरी चितळकर व अंकिता भोसले यांनी ईरटीका कारमध्ये डॉक्टर यांना मारहाण करून खंडणीसाठी अपहरण करून लोणी देवकर एमआयडीसी येथे घेऊन गेले. तिथे डॉक्टरांना ज्योती कदम ही त्यांची बहीण असल्याचे सांगून तिच्यासोबत लग्न करण्याची किंवा तिचे उदरनिर्वासाठी दहा लाख रुपये देण्याची मागणी केली.
डॉक्टरांनी त्यांना माझा ज्योती कदम हिच्यासोबत काही एक संबंध नसून पैसे देण्यास नकार देताच त्यांनी डॉक्टरांना मीडियामध्ये बातमी देऊन बदनामी करण्याची धमकी दिली. त्यांचा साथीदार इंदापूर येथील कुख्यात गुन्हेगार निलेश बनसोडे व शुभम भगत यांना बोलावून घेतले. त्या सर्वांनी डॉक्टरांना मारहाण करून खंडणी उकडण्यासाठी आळंदी येथे नेऊन लग्न करण्याचा बहाणा करून सोलापूर-पुणे रस्त्याने निघून पाटस येथे घेऊन गेले.
तेथे त्यांनी डॉक्टरांकडून खंडणी उकडण्यासाठी बारामती येथील कुख्यात गुन्हेगार झुंजार उर्फ गणेश माघाडे यास बोलवून घेतले. त्या सर्वांनी डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे डॉक्टर सहा लाख रुपये देण्यास तयार झाले. त्याप्रमाणे 13 फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता झुंजार माघाडे हा डॉक्टरांच्या हॉस्पिटल येथे येऊन चेक घेऊन जाणार असे ठरले. त्यानंतर त्या टोळीने डॉक्टरांना सोडले.
वेशांतर केले अन् रंगेहात पकडे
यानंतर डॉक्टरांनी थेट बारामती तालुका पोलीस ठाण्याचा रस्ता धरत घडला प्रकार पोलिसांना सांगितला. यातील आरोपी हे खंडणी स्वीकारण्यासाठी येत असल्याने सहायक निरीक्षक राजेश माळी, हवालदार राम कानगुडे हे वेशांतर करून डॉक्टरांच्या दवाखान्यात पेशंट बनून आले. आरोपी झुंजार माघाडे याने डॉक्टरांकडून चेक स्वरूपात खंडणी स्वीकारताच त्यास पोलीस पथकाने ताब्यात घेतले.
25 मार्चपर्यंत कोठडी
6 मार्च रोजी यातील उर्वरित आरोपींचा शोध घेत असताना बारामती तालुका पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस हवालदार राम कानगुडे यांना मिळालेल्या माहितीवरून यातील आरोपी ज्योती कदम, अंकिता भोसले, निलेश बनसोडे, चेतन गायकवाड यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे केलेल्या तपासामध्ये सदर सर्व आरोपींची गुन्हेगारी टोळी असल्याचे व त्यांनी यातील फिर्यादी डॉक्टर यांना सुनियोजित कट रुचून खंडणीसाठी अपहरण केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींना न्यायालयाने 25 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे. दाखल गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे हे करीत आहेत.