पैठणीच्या कार्यक्रमातील प्रकार; महावितरण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
चिखली (वार्ताहर) – चिखली येथील गजानन म्हेत्रे उद्यानात राजरोस खेळ रंगला पैठणीच्या कार्यक्रमात वीजचोरीचा खेळ रंगविण्यात आला. मोकळ्या मैदानात आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ही वीजचोरी करण्यात आली. विशेष म्हणजे विश्वरत्न इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून दोन दिवसीय कार्यक्रमाचे उद्यानात आयोजन करण्यात आले. यावेळी झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमासाठी महावितरणच्या डीपी बॉक्समधून वीज चोरी करण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे नगरसेविका साधना मळेकर यांचे सौजन्य या कार्यक्रमाला होते. या संपूर्ण प्रकाराकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनीही अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे हा विषय सध्या परिसरात चर्चेचा बनला आहे.
या कार्यक्रमासाठी महापालिकेमध्ये जनतेचे प्रतिनिधीत्व करणारे नेते उपस्थित होते. त्यामध्ये आजी माजी पदाधिकारी उपस्थित असताना शालेय कार्यक्रमासाठी धडधडीत वीज चोरीचा उद्योग करण्यात आला. पहिल्या दिवसाचाच कित्ता दुसऱ्या दिवशी गिरविण्यात आला. पहिल्या दिवशी (बुधवार दि. 22) शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी वीज चोरी करण्यात आली तर दुसऱ्या दिवशी (गुरुवार दि. 23) झालेल्या खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमालाही डीपी बॉक्समधून थेट वायर जोडून वीज घेण्यात आली होती.
वीज चोरीचे प्रकार वारंवार होत असताना महावितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी मात्र डोळ्यांवर पट्टी बांधून अशा प्रकारांना छुपा आशीर्वादच देत असल्याचे समोर येत आहे. शहरात ठिकठिकाणी अशा प्रकारे वीज चोरीच्या घटना घडत आहेत. त्यांना स्थानिक महावितरण कर्मचाऱ्यांची फूस असल्याचे बोलले जात आहे. अशी वीज चोरी करणाऱ्या व्यक्तींवर महावितरणाने गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून दंड वसूल करावा, अशी मागणी स्थानिकांतून होत आहे. तर शाळेच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
वीज चोरीमुळे अपघातास निमंत्रण
हा शालेय कार्यक्रम असल्याने त्या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. उघड्या वायरद्वारे होणारी वीजचोरी ही अपघाताला निमंत्रण देणारी होती. अनावधानाने दुर्दैवी घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
विद्यार्थ्यांसमोर चोरीचा आदर्श?
विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शाळांनीच जर असे उद्योग केले तर त्या विद्यार्थ्यांवर कोणते संस्कार होतील. वीजचोरी करून या शाळेने विद्यार्थ्यांसमोर चोरीचा आदर्श ठेवला आहे का? अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती. शाळाच वीजचोरी करणार असतील तर उद्या विद्यार्थीही या गोष्टींचे अनुकरण करणार नाहीत का? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
सर्वच कार्यक्रमात “त्याच’ ठिकाणाहून वीज- साधना मळेकर
गजानन म्हेत्रे उद्यानात होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमासाठी डीपीतून थेट वीज घेतली जाते. आजपर्यंत असेच घडत आले आहे. मी शाळेचा कार्यक्रम असल्याने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माझा वीजचोरीशी काहीही संबंध नाही. प्रभागाची लोकप्रतिनिधी म्हणून कार्यक्रमाला गेले होते, अशी प्रतिक्रिया वीज चोरीबाबत विचारले असताना नगरसेविका साधना मळेकर यांनी “प्रभात’शी बोलताना दिली.