- निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची गर्दी
- मास्क, सामाजिक अंतराचे नियम धाब्यावर
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीसाठी सदस्य व नवनिर्वाचित सभापती ऍड नितीन लांडगे यांच्या कार्यकर्त्यांनी पालिका भवनमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. यावेळी सामाजिक अंतर, मास्क आदी नियमांना कार्यकर्त्यांनी धाब्यावर बसविले.
शहरामध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. सातत्याने शहरातील रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे करोना नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. मात्र आज पालिका भवनमध्येच करोना नियमांचे उल्लंघन करण्यात आले. पालिका भवनमध्ये आज स्थायी समिती सभापतीची निवडणूक झाली. त्यासाठी नवनिर्वाचित सदस्य व सभापतींच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अनेकजणांनी मास्क परिधान केले नव्हते. तसेच सामाजिक नियमाच्या पालनाकडेही सर्रास दुर्लक्ष केले होते. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनानेही काहीही काळजी घेतली नाही. सुरक्षारक्षकांनी या कार्यकर्त्यांना रोखले नसल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
पदाधिकाऱ्यांनाही करोना नियमाचे भान नाही
स्थायी समिती सभापतीची निवड झाल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक पदाधिकारी अभिनंदन करण्यासाठी पुढे येत होते. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनीही मास्क परिधान केलेले नव्हते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनाही करोनाचे गांभीर्य नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे.