पुणे – पूजा साहित्य, फुले खरेदीसाठी सोमवारी (दि.18) मंडई, हुतात्मा बाबू गेनू चौक, मार्केट यार्ड परिसरात गर्दी झाली होती. उपनगरांतील बाजारपेठेतही सकाळपासून नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. गणेशोत्सवानिमित्त मार्केट यार्डातील फूल बाजारात पुणे जिल्ह्यातील यवत, सोरतापवाडी भागातून फुलांची मोठी आवक झाली. सजावटीसाठी लागणाऱ्या झेंडूची आवक सोलापूर, बीड जिल्ह्यांतून आवक सुरू झाली आहे. पावसामुळे फुले भिजली आहे.
चांगल्या प्रतीच्या सुक्या फुलांना चांगले भाव मिळाले आहेत. सोमवारी सकाळपासून हार, फूल विक्रेते, तसेच घरगुती ग्राहकांची मार्केट यार्डातील फूल बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. गौरी आगमनाच्या दिवशी फुलांच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे. विसर्जनापर्यंत फुलांचे भाव तेजीत राहणार असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फूल व्यापारी सागर भोसले यांनी दिली.
मंडई, हुतात्मा बाबू गेनू चौक, शनिपार परिसरात पूजा साहित्य आणि फुले खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. फुले, केवडा, कमळ, पत्री, अत्तर, कापूस, विड्यांचे पाने, फळे खरेदीसाठी गर्दी झाली होती. मंडई परिसरात वाहतूक सोमवारी सकाळपासून विस्कळीत झाली होती.
घाऊक फूल बाजारातील भाव (प्रतिकिलो) :झेंडू- 30 ते 55 रुपये, गुलछडी 500 ते 700 रुपये, बिजली- 50 ते 80 रुपये, कापरी- 30 ते 70 रुपये, ऍस्टर (चार गड्डीचे भाव)- 20 ते 25 रुपये, सुट्टा 80 ते 100 रुपये, शेवंती- 50 ते 80 रुपये, ग्लॅडिएटर 80-100 रुपये, गुलछडी काडी – 100 ते 150 रुपये, डच गुलाब (20 नग) – 100 ते 180 रुपये, लिली बंडल (50 काडी) – 70 ते 90 रुपये, जर्बेरा 20 ते 40 रुपये, कार्नेशन 150 ते 200 रुपये, ऑर्किड – 350 ते 500 रुपये.