पारनेर -पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील व्यक्तीचा मंगळवारी (दि. 12) मृत्यू झाला होता. ही व्यक्ती करोनाबाधित असल्याचे अहवाल आज तालुका प्रशासनास प्राप्त झाला आहे. त्यामुळे तालुक्यात करोनाचा पहिला बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. पारनेर तालुक्यात निघोज येथील 39 वर्षीय व्यक्ती कामानिमित्त मुंबई येथे राहत होती. परंतु करोनाच्या प्रादुर्भावामुळे या व्यक्तीने 3 मे रोजी कुटुंबासह पारनेर तालुक्याकडे धाव घेतली.
पिंपरी जलसेन येथे सासूरवाडीस ही व्यक्ती कुटुंबासह मुक्कामास होती. खोकला व श्वास घेण्यास त्रास होत असल्याने या व्यक्तीने खासगी रुग्णालयात उपचार घेतले. मात्र फरक न पडल्याने सोमवारी (दि.11) निघोज येथील आरोग्य केंद्रात तपासणीस गेला. तेथे तपासणी केल्यानंतर त्यास करोना चाचणीसाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी सांगण्यात आले. मात्र नगरला न जाताच ही व्यक्ती पुन्हा पिंपरी जलसेन येथे आपल्या नातेवाइकांच्या घरी गेली.
मंगळवारी (दि. 12) पहाटे या व्यक्तीस श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यामुळे रुग्णवाहिकेतून त्यास नगरला उपचारासाठी नेण्यात येत होते. मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रशासनाने या व्यक्तीचा स्त्राव पुणे येथे तपासणीस पाठविला होता. त्याचा अहवाल आज उशिरा प्राप्त झाला. त्यात या ही व्यक्ती करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अहवाल आल्यानंतर आरोग्य विभागाने तातडीने या कुटुंबातील सर्वांना विलगीकरण कक्षात हलविले आहे. तसेच या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. तहसीलदारांनी पिंपरी जलसेन व निघोज ही गावे सील करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कुणीही घराबाहे पडू नये, असे आवाहन केले आहे.