सांगली – कामेरी येथील 94 वर्षाच्या आजींनी करोनावर यशस्वी मात केली असून मिरज करोना रुग्णालयातून करोनामुक्त 94 वर्षीय आजींना बुधवारी डिस्चार्ज दिला आहे. यावेळी डॉक्टर आणि नर्स यांच्याकडून टाळ्या वाजवत आजींना शुभेच्छा देण्यात आल्या. सांगली जिल्ह्यातील कामेरी येथील करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 94 वर्षाच्या महिलेला करोनाची लागण झाली होती. त्यांना मिरजेतील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते.
या महिलेवर शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय स्टाफकडून उपचार करण्यात आले. त्यांची काळजी घेण्यात आली. या सर्वांच्या प्रयत्नामुळे आजी करोनामुक्त झाल्या. आयसोलेशन कक्षात दाखल केल्यापासून 14 दिवसांनंतर आजींची स्त्राव चाचणी घेण्यात आली. दोन्ही चाचण्यांत त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. या आजीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापूर्वीसुद्धा मिरजेतील करोनाच्या रुग्णालयात दोन वर्षाच्या करोना पॉझिटिव्ह बाळावरही यशस्वी उपचार करून त्यालाही करोनामुक्त करण्यात आले आहे.
यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नंदकर म्हणाले, “सर्वच रुग्णांना या हॉस्पिटलचे डॉक्टर्स व सर्व स्टाफ अत्यंत चांगल्या प्रकारे व गुणवत्तापूर्ण सेवा देत आहेत. रुग्ण हा केंद्रबिंदू समजून सेवा दिली जाते आहे. जिल्हा प्रशासन व कोव्हिड रुग्णालय यांच्यात अत्यंत चांगला समन्वय आहे.’ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज हे करोना रुग्णालय म्हणून म्हणून घोषित करण्यात आले असून या हॉस्पिटलने आतापर्यंत अत्यंत चांगली कामगिरी केली आहे.
94 वर्षाच्या आजींची तब्येत स्थिर आहे. इथून पुढेही 14 दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येणार असून त्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात येणार आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मंगळवारी सांगलीतील फौजदार गल्ली आणि मिरजेतील होळी कट्टा येथे करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे हा भाग प्रशासनाने पूर्ण पणे सील केला आहे. या ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. या ठिकाणी पोलिसांनी चेक पोस्ट उभारले आहे.