मुंबई – काही दिवसांपूर्वीच ‘महिला प्रीमियर लीग’च्या पहिल्या सत्रासाठी मुंबईत लिलाव आयोजित करण्यात आला होता. यावेळी बीसीसीआयने महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रकही जाहीर केले होते. महिला प्रीमियर लीगच्या या पहिल्या सत्रात एकूण 20 लीग सामने आणि 2 प्लेऑफ सामने 23 दिवसांच्या कालावधीत खेळवले जातील. मुंबईचे डी.वाय पाटील स्टेडियम आणि ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये 11-11 सारखेच सामने होतील. तर, 26 मार्च रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाईल.
आज पासून 4 मार्च पासून महिला प्रीमियर लीगची सुरुवात होत आहे. रंगतदार उद्घाटन सोहळ्याने या सोहळ्याची सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्याच्या अवघ्या दोन तास आधी हा उद्घाटन सोहळा सुरु होईल. या सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि क्रिती सेनन धमाकेदार नृत्य सादर करणार आहेत. तसेच, प्रसिद्ध गायक एपी ढिल्लो आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. या दिमाखदार सोहळ्याची संपूर्ण तयारी झाली आहे.
दरम्यान, महिला प्रीमियर लीगचा पहिला सामना नवी मुंबईतील डी.वाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील ब्लॉकबस्टर लढतीने महिला प्रीमियर लीगची सुरुवात होईल. अशा परिस्थितीत हा उद्घाटन सोहळा 5.30 वाजता सुरु होईल. त्यानंतर उद्या 5 मार्च रोजी चा पहिला डबल-हेडर होईल. ब्रेबॉर्न स्टेडियमवर पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे.