मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची माहिती
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. तसेच येत्या 5 ऑक्टोबरला मनसेची पहिली प्रचारसभा होणार असल्याचीही माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे. सोमवारी वांद्रयातील एमआयजी मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणूक ताकदीनं लढवण्याची घोषणा केली. मेळाव्यानंतर राज ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी, मंत्रालयामध्ये विष प्राशन करुन आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. तसेच नाशिकचे शिवसेना नगरसेवक दिलीप दातीर यांनी देखील मनसेचा झेंडा हाती घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेमध्ये इनकमिंग सुरु झाले आहे. नरेंद्र धर्मा पाटील आणि शिवसेना नगरसेवक दिलीप दातीर यांनी मनसेमध्ये प्रवेश केला असून दोघेही निवडणूक लढवणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले. दरम्यान, ‘रोज चार-पाच उमेदवारांची नावं जाहीर करेन’, असे राज ठाकरे यांनी सांगितले. ‘ 5 तारखेच्या प्रचारसभे दरम्यान मला बरंच काही सांगायचे आहे. ऐवढ्या दिवस जे काही बोललो नाही ते पहिल्या प्रचारसभेत महाराष्ट्रातील जनतेला मी सांगेन’, असे राज ठाकरे यांनी सांगितले.