आयुष्यभरातील गुंतवणुकीला खिंडार न पडण्यासाठी (भाग-१)
वैयक्तिक अपघात : यामध्ये कोणत्याही अपघातामुळं त्या व्यक्तीचा केवळ दुर्दैवी अंत झाल्यासच ही विमा रक्कम मिळते असं नाही तर अवयव निकामी झाल्यास देखील ही रक्कम मिळते. या रकमेव्यतिरिक्त ॲडमिट करताना येणारा (एअर अँब्युलन्ससकट) खर्च, नातेवाईकांचा प्रवासखर्च, बेडरेस्ट असल्यास कापलेल्या सुट्ट्यांचा खर्च, अशा अनेक इतर खर्चांसह अगदी विमा असलेल्या व्यक्तीची मयत झाल्यास अंत्यविधीच्या खर्चाची देखील या प्रकारात तजवीज केलेली आहे.
गाडीचा विमा : आजकाल नवीन गाडी घेताना आणि नंतर त्याचं नूतनीकरण बंधनकारकच केलं असल्यानं आजकाल प्रत्येकाकडं हा विमा असतोच. तरी देखील हा विमा काढताना गाडीतील मौल्यवान गोष्टी देखील यात अंतर्भूत आहेत का याची खात्री करावी.
घरविमा : घराचा देखील विमा काढणं गरजेचं आहे. आपल्या फायनॅन्शिअल ॲड्वायजरने ही गोष्ट कितीही कानी-कपाळी ओरडून सांगितली तरी बहुतेक लोक सहजासहजी अशा प्रकारचा विमा काढताना दिसून येत नाहीत. घरकर्ज काढताना कर्जदेणाऱ्या बँकेची फॉरमॅलिटी म्हणून मात्र मुकाट्यानं तो काढला जातो. यामध्ये घरफोडी, चोरी, घराचं व त्यातील सामानाचं नुकसान, स्थलांतरखर्च, इ. गोष्टी समाविष्ट असतात. कोणतंही घर सजवताना आपण ते किती कौतुकानं, कल्पकतेनं सजवत असतो, मग ड्रॉईंग रूममधील महागडे होम-डेकॉर, झुंबर, गालिचा, पडदे यांच्या रंगसंगतीपासून ब्रँडेड ऑटोमेटेड इलेक्ट्रॉनिक्स, किचन मधील सुबक पारंपरिक काच-सामान तर बेडरूममधील महागडे बेड्स-वॉर्डरोब ते अगदी थेट टेरेवरील सिटआऊट फॉर बार्बेक्यू पर्यंत. एखादी चूक, ठिणगी, अपघात किंवा पूर या गोष्टी सर्व परिश्रमांवर पाणी फिरवावयास पुरेशा ठरतात. या विमा प्रकारात घरातील प्रत्येक गोष्ट (अगदी महागडं पेंटिंग खराब होण्यापासून) तर सुरक्षित होतेच शिवाय नैसर्गिक आपत्तीमुळं झालेलं आर्थिक नुकसान देखील परत मिळवता येतं.
आज विमा काढताना केवळ त्याचा प्रीमियम कमी असल्यास अशा कंपनीकडून विमा काढला जातो. परंतु प्रीमीयमकडं न पाहता त्या पॉलिसीमधून आपले उद्देश योग्यप्रकारे व निश्चितपणे साध्य होतील का हे तपासावं आणि त्याजबरोबरीनं प्रीमियम जास्त येतोय म्हणून एखादी गोष्ट लपवणं किंवा खोटं सांगणं हे ती विमापॉलिसी न घेण्यासारखंच आहे. म्हणून माझं असं मत आहे की, विमा एजंट हाएकतरविश्वासार्हहवा मग तो ओळखीतलानसेल तरी चालू शकेल. खासकरून संपूर्णआर्थिक सल्लागार असेल तर उत्तमच. याचं कारण म्हणजे एकतर तो स्वतःच्या फायद्यासाठी तुम्हाला फसवणार नाही व तुमची आर्थिक गणितं त्यांना चांगली माहित असल्यानं त्यात कुठं तडजोड करायची व कुठं आग्रहानं विमा काढायचा ह्याची सांगड उत्तमप्रकारे आणि तेही योग्य वेळी घालणं हे त्यांचं कर्तव्य समजून ते तोजबाबदारीनं पार पाडेल. वरील प्रमुख पाच विमाप्रकारांव्यतिरिक्त इतरही कांही विमा प्रकार आढळतात परंतु ‘मस्ट’ या सदराखाली ह्या पाच विम्यांद्वारे सुरक्षित झाल्यास व त्यांसाठी लागणारी प्रीमियम रक्कम ही योग्य आर्थिक नियोजन करताना दरमहा बाजूला काढल्यास कोणतेही संकट तुमच्या आर्थिक गुंतवणूकीस खिंडार पाडू शकत नाही हे नक्की. त्यामुळं ठरवलेली गुंतवणूक योग्य साधनांत करत राहिल्यास आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ध्येयपूर्ती होऊन आर्थिक समाधान मिळणारच आणि मग सरतेशेवटी आपणनक्कीच आनंदानं म्हणू शकतो, चला आयुष्यावर बोलू कांही..