पुणे – जेमतेम 25 वर्षांच्या ब्रेन डेड मुलाच्या नातेवाईकांनी अवयवदानाला परवानगी दिली आणि हृदय घेऊन कोल्हापूरवरून निघालेली रुग्णवाहिका अवघ्या 150 मिनिटांमध्ये पुण्यात पोचली. तातडीने हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून एका रुग्णाचे प्राच वाचविण्यात पुण्यातील वैद्यकीय तज्ज्ञांना यश आले.
कोल्हापूर ते पुणे हे 231 किलोमीटर अंतराचे ग्रीन कॉरिडॉर करून हृदय आणि मूत्रपिंड पुण्यातील रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी आणले. हृदय सह्याद्री रुग्णालयातील रुग्णाला आणि मूत्रपिंड पूना हॉस्पिटलमधील गरजूला प्रत्यारोपित करण्यात आले. तसेच, यकृत आणि दुसरे मूत्रपिंड कोल्हापूर येथील रुग्णाला प्रत्यारोपित करण्यात आले.
जेमतेम वयाच्या पंचविशीतील युवक कोल्हापूर परिसरात अपघातात जखमी झाला. अंतर्गत रक्तस्राव झाला. त्यामुळे त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, त्याच्या मेंदूला मार लागल्याने त्याने उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर, त्यांच्या मेंदूचे कार्य थांबल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यानंतर अवयव दान करण्याच्या आवाहनाला त्याच्या नातेवाईकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे दोन्ही मूत्रपिंड, हृदय आणि यकृत असे अवयव दान करण्यात आले.
हा तरुण वीज वितरण कंपनीत करार पद्धतीवर काम करत होता. याचा मोठा भाऊ मानसिक आजारी, तर आई-वडील ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यामुळे घराचा आधार असलेला आपला मुलगा दान अवयवाच्या रुपात आपल्यामध्ये राहील, या भावनेने हे कुटुंब अवयव दानासाठी तयार झाले. सह्याद्री रुग्णालयात डॉ. मनोद दुराईराज यांच्या पथकाने हे हृदय प्रत्यारोपण केले. याबाबत झोनल ट्रान्सप्लॅंट को-ऑर्डिनेशन कमिटीच्या आरती गोखले यांनी माहिती दिली.