सातारा, दि. 25 (प्रतिनिधी) -येथील बसस्थानक परिसरात वाहतूक नियमन करत असलेल्या पोलीस हवालदार सोमनाथ शिंदे यांनी एका दुचाकीवरून तिघेजण निघालेल्या युवकाला थांबवून त्याला त्याबाबतचा तसेच यापूर्वीचा दंड भरण्यास सांगितल्याने संतापलेल्या युवराज लोखंडे (रा. कामेरी, ता. सातारा) याने अंगावर डिझेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याप्रकरणी लोंखडे याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी हवालदार सोमनाथ शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी दि. 25 रोजी सातारा बसस्थानक परिसरात क्रीडा संकुलाकडून येणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलीस कोंडी दूर करीत असताना कोंडीत अडकेल्या एसटी बसच्यामधून लोंखडे त्याच्याकडील दुचाकीवरून अन्य दोघांसह निघाला होता. ही बाब हवालदार शिंदे यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी त्याला थांबवले. लोखंडेकडे वाहन चालवण्याचा परवाना नव्हता. तसेच त्याच्या दुचाकीला नंबर प्लेट नसल्याने हवालदार शिंदे यांनी नियमानुसार साडेसात हजार रूपये दंड होत असल्याचे सांगितले.
यावेळी लोखंडे याने पोलिसांशी हुज्जत घालत नाटक करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याने अचानक कॅनमध्ये आणलेले डिझेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्याला रोखून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला सातारा शहर पोलीस ठाण्यात नेण्यात
आले.