मुंबई – देशभरात बहुप्रतीक्षित करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा आज शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. यावेळी पंतप्रधानांनी देशवासियांना संबोधित केले. देशात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. यासाठी मी देशवासीयांचे अभिनंदन करतो. ज्यांना सगळ्यात जास्त गरज आहे, त्यांनाच सगळ्यात आधी करोना लस मिळेल, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले कि, आपले डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचारी यांना सर्वात आधी लस दिली जाईल. या सगळ्यांचा करोना लसीवर पहिला हक्क आहे. त्यानंतर अत्यावश्यक सेवा आणि कायदा सुव्यस्थेची जबाबदारी असणाऱ्या लोकांना लस दिली जाईल.
#WATCH live: PM Modi launches nation-wide COVID-19 vaccination drive via video conference. https://t.co/ZS0oJofkVl
— ANI (@ANI) January 16, 2021
तसेच, मी सगळ्यांना आठवण करून देतो की, करोना लसीचे दोन डोस घेणे अत्यावश्यक आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये एका महिन्याचे अंतर असेल. दुसरा डोस घेतल्यानंतर २ आठवड्यांनी आपल्या शरीरात करोना प्रतिबंधात्मक शक्ती निर्माण होईल, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
पहिल्या आणि दुसऱ्या लशीचा डोस घेण्यामध्ये एक महिन्याचा वेळ लागतो. लस लागल्यानंतर तुम्ही बिनधास्तपणे वागू नका, मास्क वापरणे सोडू नका, सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडू नका. लस घेतल्यानंतर सुद्धा हे नियम कायम राहणार आहे.
करोना लसीकरण आता सुरू झाले आहे. संपूर्ण देशातील लोकांचे मी अभिनंदन करतो. करोनावर लस तयार करण्यासाठी डॉक्टरांनी जीवाचे रान केले. त्यांनी सण पाहिले नाही, ना उत्सव पाहिले नाही. लस तयार करण्यासाठी अनेक वर्षांचा कालवधी लागत असतो. पण, अवघ्या काही महिन्यात डॉक्टरांनी करून दाखवले आहे. आता मेड इन इंडिया असलेल्या दोन लसी उपलब्ध झाल्या आहे, असे कौतुकही मोदींनी केले आहे.
इतिहासात इतक्या व्यापक स्वरूपातील लसीकरण यापूर्वी कधीही झाले नाही. जगात १०० पेक्षा अधिक देश असे आहेत की, ज्यांची लोकसंख्या ३ कोटींपेक्षा कमी आहे. तर दुसरीकडे भारतात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ३ कोटी लोकांना लस दिली जाणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाची माहिती देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, पहिल्या टप्प्यात तीन कोटी कोविड योद्ध्यांना लस देण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३० कोटी नागरिकांना करोनाची लस देण्यात येईल. ज्येष्ठ नागरिक, गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना दुसऱ्या टप्प्यात लस दिली जाईल.