पिंपरी-चिंचवड क्षेत्रीय कार्यालयातील अंतर्गत बदलीसाठी राजकीय वरदहस्ताचा वापर

महिला कर्मचाऱ्यांना त्रास देऊन वरिष्ठांकडून मानसिक खच्चीकरण

चऱ्होली – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी येथील ई क्षेत्रीय कार्यालयात वैयक्तिक स्वार्थ आणि कामचुकार वुत्तीमुळे राजकीय वरदहस्त वापरून मोक्‍याच्या ठिकाणी कर्मचारी बदली करून घेतात. पण यात महिला कर्मचाऱ्यांचा नाहक बळी जात आहे. काही महिन्यातच एका विभागातून दुसऱ्या विभागात अंतर्गत बदलीला महिला कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे चांगले काम करूनही सततच्या बदल्यांना सामोरे जावे लागत आहे.

क्षेत्रीय कार्यालयातील हा प्रकार बरेच दिवसांपासून सुरू आहे. मनाप्रमाणे बदली करून पुरुष अधिकारी आपले स्वहित सांभाळण्यात मशगूल आहेत. शिवाय येथील महिला कर्मचाऱ्यांची गुंतागुंतीच्या व किचकट काम असणाऱ्या टेबलावर नेमणूक करायची व तेथील विस्कळीत कामाची घडी बसली की लगेचच तिथून परत दुसऱ्या टेबलावर बदली केली जाते. अशा वागणुकीमुळे महिलांनी संताप व्यक्त केला आहे. या विषयी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारला तर हा प्रकार एवढ्यावरच न थांबता वरिष्ठांची मर्जी न सांभाळणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देणे, इतर लोक किंवा नागरिकांसमोर पाणउतारा करणे, चुका काढणे या प्रकारे त्रास दिला जातो.

क्षेत्रीय कार्यालयातील काही कर्मचारी वर्षोनुवर्षे एकाच जागेवर ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे कामाची वेळ आणि उपस्थिती यांना बंधनकारक नसते. राजकीय व्यक्तींची खासगी कामे करून दिवस भरला जातो आणि आपल्या सोयीनुसार बदली करून घेऊन दिवसभर चकाट्या मारीत फिरायचे हा उद्योग होऊन बसला आहे.

महिला कर्मचाऱ्यांनी याबाबत तक्रार अथवा वाच्यता केल्यास अशा महिला कर्मचाऱ्यांना जाणूनबुजून कोंडीत पकडले जाते. बदनामी केले जाते. काही महिलांना भ्रष्टाचाराचे आरोप करून मानसिक खच्चीकरण केले जाते. असाच काहीसा अनुभव क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एका मीटर निरीक्षक महिलेला आला असून त्या महिलेला बदनाम करून तिची बदली करण्यात आली. शेवटी या महिलेने कोर्टात धाव घेतली. तर आणखी एका महिला कर्मचाऱ्यांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्या विरोधात महिला तक्रार निवारण केंद्राकडे तक्रार दाखल केली असून, ते प्रकरण धूळ खात पडलेले आहे.

राजकीय हस्तक्षेपाचा जाच
राजकीय हस्तक्षेपामुळे कर्मचाऱ्यांना काम करणे अवघड झाले आहे. यामध्ये प्रामाणिक कर्मचारी भरडले जात आहेत. बोलता येईना आणि सांगता येईना, अशी अवस्था झाली आहे. तशात सध्या कोविड-19 मुळे थम्ब इम्प्रेशन नसल्यामुळे कर्मचारी फक्त हजेरी लावून बिनधास्त पोबारा करीत आहेत. अशा या सर्व प्रकारांमुळे व अनागोंदी कारभारामुळे ई क्षेत्रीय कार्यालयातील कामासाठी नागरिकांना रोज चकरा माराव्या लागत आहेत. पारदर्शक कारभाऱ्याकडून चांगली सेवा मिळावी, अशी माफक अपेक्षा नागरिकांनी केली तर वावगे ठरू नये.

महिला कर्मचाऱ्यांना सापत्नपणाची वागणूक दिली जाते. पुरुष कर्मचारी वरिष्ठांचे कान भरून, राजकीय वजन वापरून हव्या त्या जागी बदली करून घेतात. आम्ही या विरोधात आवाज उठवल्यास नाहक त्रास देतात.
– त्रस्त महिला कर्मचारी, ई क्षेत्रीय कार्यालय, भोसरी


आजही महिला कर्मचाऱ्यांसोबत दुजाभाव केला जात आहे. या कार्यालयात महिलांना मानसिक ताणतणावात काम करावे लागते. या सावित्रीच्या लेकी फक्त सरकारी नोकरी आहे म्हणून मूग गिळून गप्प बसत आहेत. आयुक्तांनी या भोंगळ कारभारावर लक्ष द्यावे, अशी माझी मागणी आहे.
– वसंत रेंगडे, सामाजिक कार्यकर्ते

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.