नॉर्वे : लसींनंतर करोनाचा विळखा कमी होणार असल्याची आशा सर्वत्र आहे मात्र नॉर्वेतून चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. लसीकरणानंतर काही वेळातच २३ वृद्ध नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्याचबरोबर अनेकजण आजारी पडले आहेत. या घटनेमुळे नॉर्वेची डोकेदुखी वाढवली असून, सरकारने या घटनांची चौकशी सुरू केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयीची वृत्त दिले आहे. नॉर्वेत लसीकरण सुरू असून, लस घेतल्यानंतर काही वृद्ध नागरिकांचा मृत्यू झाला आहे. फायझर-बायोएनटेक लस घेतल्यानंतर २३ ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला. तर अनेकजण आजारीही पडले आहेत. नॉर्वे डॉक्टरांनी या मृत्यूचा तपास सुरू केला आहे. ज्या व्यक्ती ८० वर्षांपेक्षा जास्त आहेत. त्यांच्यामध्ये लस घेतल्यानंतर दुष्परिणाम दिसून आले आहेत, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
या नागरिकांचा मृत्यू फायझर लसीमुळेच झाल्याचे अजून निष्पन्न झालेले नाही. मात्र, मृत्यू झालेल्या २३ लोकांपैकी १३ जणांमध्ये डायरिया आणि ताप यांची लक्षण दिसून आली असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. नॉर्वेत २३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आणि चिंता व्यक्त होऊ लागल्यानंतर फायझरने युरोपमध्ये केला जाणारा लसीचा पुरवठा तात्पुरत्या काळासाठी कमी केला आहे.
दुसरीकडे फायझरकडून मर्यादित स्वरूपात उत्पादन होत असल्याने पुरवठा कमी करण्यात आल्याचे नॉर्वेजियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ विभागाने म्हटले. प्रतिवर्ष १.३ बिलियनवरून २ बिलियनपर्यंत लसीचे अद्ययावत उत्पादन करण्यासाठी हे करण्यात येत आहे. त्याचबरोबर आता ८० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना लस देण्यासंदर्भात विशेष इशाराही विभागाने दिला आहे. नॉर्वेत डिसेंबरच्या अखेरीपासून आतापर्यंत ३० हजार लोकांना फायझर वा मॉर्डन या दोन्ही एका लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.