लखनौ : उत्तर प्रदेशमधील फिरोझाबाद जिल्ह्यात बलात्कार पिडितेच्या वडिलांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ते कामामवरून सोमवारी सायंकाळी परतत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.
त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हालवण्यात आले. मात्र तेथे ते मृत झाल्याचे घोषीत करण्यात आले. बलात्कार करणाऱ्या तरूणानेच ही हत्या केल्याचे पिडितेच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. ही घटना घडल्यानंतर निष्काळजीपणा दाखवल्याने दोन निरीक्षकांसह तीन पोलिसांना तात्काळ बडतर्फ करण्यात आले. आरोपींना शोधण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली आहे.
मृत पावलेल्या व्यक्तीच्या मुलीवर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बलात्कार करण्यात आला होता. याबाबत पोलिसांत फिर्याद देऊनही आरोपीला अटक करण्यात आली नव्हती. आम्ही गुन्हा नोंदवला आहे. आरोपीनेच हत्या केली का? हे आम्ही तपासत आहोत, असे फिरोझाबादमधील एका वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
गेल्या वर्षी दोन बलात्कार पिडितांची पेटवून हत्या करण्यात आली होती. या दोन्ही प्रकरणात आरोपीशी पोलिस सहजतेने वागत असल्याचा आरोप करण्यात आले होते. काही बलात्कार पिडितांनी न्याय मिळावा म्हणून स्वत:ला पेटवून घेण्याच्या घटनाही घडल्या आहेत. बलात्कार पिडिता आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेवरून उत्तर प्रदेशातील भाजपा सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे.