मेढ्यातील नागरिकांच्या नशिबी खड्डेच खड्डे

मेढा – मेढा हे जावळी तालुक्‍याचे नाक असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मात्र मेढा शहरातील रस्त्यांची सध्याची अवस्था पाहता जावळी तालुक्‍याचे नाक कापल्यासारखे झाली आहे. शहरातील रस्त्यांचे काम ज्या ठेकेदाराला दिले होते त्याने प्रत्येक प्रभागात अर्धवट काम केल्याने वाहनधारकांसह नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली असून मेढा नागरिकांच्या नशिबी खड्डेच खड्डे अशी भावना व्यक्त होताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी तात्काळ या रस्त्यांची कामे करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
जावळी तालुक्‍याचे मुख्य ठिकाण असलेल्या मेढ्यात समस्यांचे ग्रहण सुटता सुटेना.

कचरा स्वच्छता यात नगरपंचायतीने नावलैकिक वाढवला असला तरी येथील रस्त्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मेढा येथील कमानी चौक ते देशमुख आळी रस्त्याची चार वर्षांपासून दुरवस्था झाली असून येथील नागरिक अद्यापही या रस्त्याच्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. मुख्य बाजार पेठ ते देशमुख आळी हा रस्ता तब्बल 7-8 प्रभागांना जोडतो तर तेवढेच नगरसेवकांचे वास्तव्य या परिसरात असूनदेखील येथील नागरिकांच्या नशिबी खड्डेच खड्डे आहेत.

गेल्या नोव्हेंबरमध्ये मोठ्या धुमधडाक्‍यात या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले तर तत्कालीन मुख्याधिकारी गायकवाड यांनी तीन महिन्यांत रस्त्यांची कामे पूर्ण करू, असे आश्‍वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात एक वर्ष पूर्ण होऊन देखील 50 टक्केसुद्धा काम पूर्ण झाले नाही.
ठेकेदाराने रस्ते अर्धवट फोडल्यामुळे येथील रस्त्यांची आणखीन वाट लागली आहे. तर गटारांची उंची जमिनीपासून दोन फूट ठेवल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बाजारपेठेकडे फिरकत नाहीत. त्याशिवाय खोदकामामुळे हे रस्ती आणखीनच अरुंद झाले आहेत.

बाजारपेठेतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने ग्राहक इथल्या व्यापाऱ्यांकडे फिरकत नाहीत. परिणामी व्यापाऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. बाजारपेठेलगत लक्ष्मी रोड अनेक वर्षापासून खड्ड्यातच आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपासून मेढ्यातील रस्त्यांची झालेली ही दुरवस्था प्रशासनाला दिसत नाही का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून होऊ लागला आहे. ज्या ठेकेदाराला रस्त्याचे काम दिले होते त्याने प्रत्येक प्रभागात थोडी थोडी कामे अर्धवट ठेवली आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था ही “एक ना धड अन्‌ भाराभर चिंध्या’ अशी झाली आहे.

मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी
मे महिन्यात या रस्त्याचे काम सुरू असताना शिवसैनिकांनी हे काम नियमांप्रमाणेचे करा असा आग्रह धरुन बंद पाडले होते. परंतु जनतेच्या आग्रहाखातर त्यांनी या रस्त्याबाबत ना हरकत दाखवली. नंतर पाऊस संपल्यावर ठेकेदाराने इतर प्रभागात काम सुरू केले. मात्र, या मुख्य रस्त्यालाच दुर्लक्षित ठेवले. या रस्त्याच्या खाली असलेल्या पीयुसी पाईपमुळे या रस्त्याचे कामच होणार नाही असेही काही कर्मचारी सांगत आहेत. त्यामुळे याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालावे अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.