पिंपरी – करोना महामारीच्या काळात आरोग्य सेवक जिवाची पर्वा न करता सेवा करीत आहेत. आतापर्यंत विविध जाती धर्मांतील 71 मृतदेहांचे विधीवत मोफत अत्यंविधी केले. आजही कोणतेही शुल्क न घेता काम सुरू आहे. मात्र, थेट संपर्कामुळे आम्हा सेवेकांना व आमच्या कुटुंबीयांना करोनाची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या करोना सेवकांना व कुटुंबीयांना उपचारासाठी, इंजेक्शन व खाटांसाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणी थेरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते युनूस पठाण यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, तसेच महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
गेल्या वर्षभरापासून युनूस पठाण युवा मंचाचे कार्यकर्ते हे काम करीत आहेत. आतापर्यंत 71 मृतदेहांचे अत्यंविधी त्यांनी विनाशुल्क केले आहेत. हे काम करणारे मंचचे कार्यकर्ते करोनाबाधित मृतदेहांच्या संपर्कात येतात. त्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना लागण होण्याची शक्यता आहे. अशा वेळी या सेवकांना तत्काळ उपचार मिळावेत तसेच, खासगी रुग्णालयातही सूचना द्याव्यात, अशी मागणी पठाण यांच्याकडून करण्यात आली आहे.