मुंबई : रेमडेसिविरच्या साठेबाजीप्रकरणी मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या संचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांनी रात्रीच पोलीस स्टेशन गाठले. झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी यावेळी त्यांना फक्त चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे सांगितले.
दरम्यान काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी रेमडेसिवीर खरेदी प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीची मागणी केली आहे. दिग्विजय सिंग यांनी ट्विट केले असून हा अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे म्हटले आहे.
In fact Devendra Phadnavis should be investigated from which account he bought Remdesivir worth ₹4.5 crore and also with whose permission. It is absolutely shameful.
— digvijaya singh (@digvijaya_28) April 19, 2021
दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत म्हटले की, “खरं तर फडणवीसांनी कोणत्या खात्यातून साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी केले याची चौकशी झाली पाहिजे. तसंच कोणाच्या परवानगीने केले याचीही चौकशी झाली पाहिजे. ही अत्यंत लाजिरवणी बाब आहे”.
१२ एप्रिलला भाजपा नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे दमणच्या ब्रूक फार्मा कंपनीच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यावेळी कंपनीकडून भाजपच्या नेत्यांना ५० हजार इंजेक्शन्स देण्यात आली होती. ही सर्व इंजेक्शन्स आम्ही महाराष्ट्राला देणार असल्याचे भाजपा नेत्यांनी सांगितले होते.