झेडपीसाठी महाविकास आघाडीची जुळवाजुळव सुरू

विखे गट वगळून कॉंग्रेसचे 12 सदस्य आघाडीत; शिवसेनेचे ते सदस्य आघाडीबरोबरच

शेतकरी क्रांतीचे 5 सदस्यही आघाडीत
शेतकरी क्रांतिकारी पक्षाचे नेते आमदार शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे साहजिकच तेही महाविकास आघाडीचा भाग झाले आहेत. त्यामुळे त्या पक्षाच्या 5 सदस्यांचा पाठिंबा हा देखील महाविकास आघाडीला राहण्याची शक्‍यता असल्याने आघाडीचे संख्याबळ 39 होईल.

नगर – जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या मुदतीबाबत प्रशासन संभ्रमात असताना दुसरीकडे मात्र जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम कधीही जाहीर होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन या हालचाली सुरू झाल्या आहेत. नव्याने अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीने त्यादृष्टीने जुळवाजुळव सुरू केली असून, आज झालेल्या आघाडीच्या बैठकीत प्रत्येक पक्षाने आपले सर्व सदस्य पक्षाबरोबर ठेवण्याचे ठरले. त्यामुळे शिवसेनेचे ते सदस्य (विखेंना मानणारे) आघाडीबरोबरच राहणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या 120 दिवसांच्या मुदतवाढीबाबत संभ्रम आहे. असे असले, तरी नगर जिल्हा वगळता अन्य जिल्ह्यांत जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, बहुतांशी ठिकाणी 20 किंवा 21 डिसेंबर या तारखांना या निवडी होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात राजकीय हालचालींना गती आली आहे. आज दुपारी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस या महाविकास आघाडीतील नेत्यांची एकत्रित बैठक नगरमध्ये झाली.

या बैठकीला आमदार डॉ. सुधीर तांबे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, ज्ञानदेव वाफारे आदी उपस्थित होते. या बैठकीत पक्षीय बलाबलावर चर्चा करण्यात आली. यावेळी कॉंग्रेसकडून 12 सदस्य आघाडीबरोबर असल्याचे स्पष्ट करण्यात आले. अर्थात जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे 23 सदस्य आहे. परंतु त्यापैकी 11 सदस्य भाजपचे नेते माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांना मानणारे आहेत. त्यामुळे त्यांना वगळून हा आकडा देण्यात आला. विखेंना मानणारे हे सदस्य असले, तरी तांत्रिकदृष्ट्या  आजही हे सदस्य कॉंग्रेसचे आहेत. पण त्याचा विचार करण्यात आलेला नसल्याचे सांगण्यात आले.

राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेत पक्षीय बलाबल 19, असे असले तरी त्यांनी 16 सदस्य आघाडीबरोबर असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी तीन सदस्य भाजपकडे असल्याचे स्पष्ट केले आहेत. तसेच शिवसेनेचे पक्षीय बलाबल 7 असले, तरी एक सदस्यावर गुन्हा दाखल असल्याने 6 सदस्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. त्याचे सर्वच सदस्य आघाडीबरोबर आहेत. शिवसेनेतून सदस्य झालेल्या राणी लंके या आमदार नीलेश लंके यांच्या पत्नी आहेत. आ. लंके हे राष्ट्रवादीचे आमदार असले, तरी महाविकास आघाडीमुळे त्यांचा प्रश्‍न येत नाही. असे महाविकास आघाडीचे 34 सदस्य संख्या झाली आहे. सध्या जिल्हा परिषदेत 72 सदस्य संख्या असल्याने सत्तेचा सोपान चढविण्यासाठी जादुई 33 चा आकडा आवश्‍यक आहे. आणि तो महाविकास आघाडीचा होत आहे. त्यामुळे सध्या तरी महाविकास आघाडीचा अध्यक्ष होण्याची शक्‍यता जास्त आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)