वाघोलीच्या प्रश्‍नांचा तात्काळ निपटारा करा

विभागीय आयुक्‍तांचे आदेश : आमदार अशोक पवार आक्रमक
वाघोली (प्रतिनिधी) – वाघोलीच्या कचरा, ट्रॅफिक, पाणी अशा मूलभूत प्रश्‍नांसाठी विभागीय आयुक्‍त दीपक म्हैसेकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी, पीएमआरडीए, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक विधानभवन येथे पार पडली. वाघोलीचे वाढत्या शहरीकरणाच्या प्रश्‍नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी कामे करण्याचे आदेश यावेळी म्हैसेकर यांनी दिले.

शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी वाघोलीच्या कचरा, ट्रॅफिक, पाणी व विविध प्रश्‍नांबाबत बैठक घेण्याची मागणी पुणे विभागीय आयुक्‍तांकडे केली होती. त्यानुसार सोमवारी विधान भवन पुणे येथे बैठक पार पडली. बैठकीदरम्यान वाघोलीतील समस्या मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने प्रामाणिक प्रयत्न करावा, अशी मागणी आमदार अशोक पवार आक्रमक भूमिका घेऊन मांडली.

विभागीय आयुक्‍त म्हैसेकर यांनी उपस्थित प्रश्‍नांची संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन कामे करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे, पीएमआरडीएचे नगर रचनाकर विवेक खरवडकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदिले, जलसंपदा विभागाचे अभियंता अशोक शेटे, वाघोलीचे सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.